नाशिकचा रणसंग्राम : गुरु-शिष्यांच्या प्रचारसभांनंतर दिंडोरी मतदारसंघात माहोल रंगणार

0

नाशिक । प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सध्या प्रचाराबरोबरच वाक्युद्ध रंगले आहे. हे दोन्ही नेते अखेरच्या टप्प्यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रचारसभा घेणार आहेत. त्यांच्या प्रचारसभांनंतरच मतदारसंघात निवडणुकीचा माहोल खर्‍या अर्थाने रंगणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा ज्वर अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. युती आणि आघाडीच्या स्टार प्रचारकांच्या सभांना उमेदवारांकडून मागणी वाढत आहे. दिंडोरी लोकसभेसाठी चौथ्या टप्पात म्हणजेच 29 एप्रिलला मतदान होत आहे. त्यामुळे तिसर्‍या टप्प्यातील मतदान संपताच, राज्यातील स्टार प्रचारक दिंडोरीचे रण गाजवण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सध्या प्रचारयुद्ध रंगले आहे. हे दोन्ही नेते दिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रचारसभा घेणार आहेत.पवार यांची रविवारी (दि.21) नांदगाव येथे तर दि.25 ला निफाड येथे प्रचारसभा होणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी (दि.22) पिंपळगाव बसवंत येथे जाहीरसभा होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी नियोजन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जयकुमार रावल, पंकजा मुंडे अशा तब्बल 20 प्रचारकांची यादी भाजपने तयार केली आहे.

आघाडीनेहीे मतदानापूर्वी दहा दिवस आधी प्रत्येक नेत्यांची सभा आयोजित करून मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनिती आखली आहे. सकाळी 8 ते दुपारी 2 आणि 2 ते रात्री 10 या वेळेत सभांचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी (दि.25) निफाड येथे सभा होणार आहेत. शुक्रवारी (दि. 26) धनंजय मुंडे यांची चांदवड येथे सभा होणार आहे.

माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ हेही येवला, नांदगाव, निफाड, कळवण व दिंडोरी येथे जाहीरसभा घेणार आहेत. मतदानापूर्वी दहा दिवस उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये प्रचारयुद्ध रंगणार असल्यामुळे प्रत्येक दिवशी एक सभा घेण्याची तयारी सुरू आहे.

उमेदवारांना धास्ती अवकाळीची
अवकाळी पावसाची जिल्ह्यात रविवारपासून हजेरी लावल्यामुळे उमेदवारांना प्रचार करताना समस्या निर्माण होत आहेत. काही ठिकाणी तर गारपीट व जोरदार वार्‍यासह पाऊस होत असल्याने प्रचारसभांना निर्विघ्न येणार नाही याची उमेदवारांना चिंता आहे. त्यामुळे खुल्या जागेवर सभेऐवजी हॉलमध्ये सभा घेण्याबाबत आयोजकांचा कल दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

*