कधी काळी गोल्फक्लबवर इंदिरा व राजीव गांधी यांच्या सभांना रेकॉर्डब्रेक गर्दी असायची…

0

नाशिक । कुंदन राजपूत

नाशिकचे शिवाजी पार्क अशी ओळख असलेल्या ऐतिहासिक हुतात्मा अनंत कान्हैरे मेैदानावर दिग्गजांच्या तोफा धडाडल्या आहेत. हल्ली शिवसेना व मनसेना हे दोनच पक्ष हे मैदान गाजवता. मात्र, कधी काळी इंदिरा व राजीव गांधी यांनी या मैदानावर सभा घेत गर्दीचे रेकॉर्डब्रेक केले होते.

परिणामी विरोधकांना धूळ चारत काँग्रेसचे मुरलीधर माने व प्रताप वाघ हे प्रंचड बहुमतांनी संसदेत पोहोचले होते. ती बाब वेगळी की काँग्रेसचे हे वैभव लोप पावले असून बी. डी. भालेकर मैदान सोडा, सध्या त्यांना काँग्रेस कमिटीचा हॉलही भरवता येत नाही.

1952 ते 1990 हा काँग्रेस पक्षासाठी सुवर्णकाळ होता. त्यातही इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या काळात देशभरात काँग्रेसची लाट पहायला मिळाली. नाशिकमध्येही ‘ताई, माई, अक्का विचार करा पक्का आणि पंजावर मारा शिक्का’ हेच समीकरण होते. 1984 ला तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसबद्दल सहानभुतीची लाट होती. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर माने हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांच्या विरोधात जनता दलाचे कराड मैदानात होते.

माने यांच्यासाठी राजीव गांधी यांनी आताचे हुतात्मा अनंत कान्हैरे व तेव्हाचे गोल्फ क्लब मैदानावर विराट सभा घेतली होती. इंदिराजींची हत्या हाच निवडणुकीतला प्रमुख मुद्दा होता. जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून लोक राजीव यांना पहायला आले होते. मैदान खच्चाखच्च गर्दीने तुडूंब भरले होते. गर्दीचे मतात रुपांतर झाले आणि माने हे 35 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले होते. तत्पूर्वी, इंदिरा गांधी यांनी 1980 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रताप वाघ यांच्यासाठी गोल्फ क्लब मैदानावर सभा घेतली होती.

आणीबाणी नंतर 1977 ला आलेले जनसंघाचे सरकार अल्पावधीतच कोसळले होते. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका लागल्या होत्या. नाशिकमध्ये वाघ यांच्याविरुद्ध शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसचे विनायकदादा पाटील हे उमदेवार होते. जनसंघाच्या सरकारवरील रोष हाच निवडणुकीतील प्रमुख मुद्द होता.

यावेळी इंदिराजींना ऐकायला गोल्फ क्लबवर तुफान गर्दी झाली होती. परिणामी प्रताप वाघ यांनी 50 हजारांच्या फरकाने विनायकदादा पाटील यांना आस्मान दाखवले होते. आज जरी शिवसेना व मनसेनेच्या या मैदानावर जंगी सभा होत असल्या तरी कधी काळी गांधी परिवाराने हे मैदान गाजवले होते.

रात्री दोन वाजेपर्यंत होती गर्दी

1979 मध्ये इंदिरा गांधींनी नाशिकला भेट दिली होती. त्यावेळी निवडणूक नव्हती. गोल्फ क्लब मैदानावर त्यांची सायंकाळी सहा वाजता सभा होती. जिल्ह्यातून लोक या ठिकाणी पोहोचले होते. मात्र, सभा सुरू व्हायला रात्रीचे बारा वाजले होते. तरीदेखील लोकांनी मैदान सोडले नाही. इंदिरा गांधी आल्या आणि मध्यरात्री दोन वाजेपर्यंत सभा सुरू होती.

सध्या कान्हैरे मैदान अखंड नसून दोन, तीन मैदानात ते विभागले आहे. पूर्वी हे मैदान एकसलग होते. इंदिरा व राजीव गांधी यांच्या सभेवेळी संपूर्ण मैदान गर्दीने खच्चून भरलेले असायचे. तसेच, पोलीस बंदोबस्त अथवा इतर सुरक्षेची व्यवस्थाही नसायची. या दोन्ही नेत्यांच्या सभा रेकॉर्डब्रेक ठरल्या होत्या. स्व. मुरलीधर माने यांची निवडणुकीत प्रचाराची जबाबदारी सांभाळत हे वैभवाचे क्षण मी पाहिले आहे.

– जयप्रकाश छाजेड, माजी आमदार, काँग्रेस

LEAVE A REPLY

*