गोदाकाठावर ‘अगली बार प्रधानमंत्री अटलबिहारी… अटलबिहारी’ घोषणा गाजली होती तेव्हाची गोष्ट…

0

नाशिक । कुंदन राजपूत
गोदाकाठावरील यशवंतराव महाराज पटांगण म्हटले की, वसंत व्याख्यानमालेचा ज्ञानकुंड व फर्डे वक्ते डोळ्यांसमोर येतात. पण याच पटांगणावर तत्कालीन जनसंघ व आजच्या भाजप नेत्यांच्या तोफा धडाडल्या होत्या.

सन 1989 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. दौलतराव आहेर यांच्या प्रचारासाठी भाजपची बुलंद तोफ प्रमोद महाजन व व्यंकय्या नायडू यांनी सभा गाजवली होती. यावेळी ‘अगली बार प्रधानमंत्री अटलबिहारी… अटलबिहारी’ ही घोषणा तुफान लोकप्रिय ठरली होती. भाजपच्या नेत्यांनी नाशिकमध्ये सभेसाठी हुतात्मा अनंत कान्हैरे मैदानाऐवजी गोदकाठावरील यशवंतराव महाराज पटांगणाला अधिक पसंती दिली.

1989 चे दशक भारतीय राजकारण ‘मंडल’ विरुद्ध ‘कमंडलू’ या मुद्यावरून सर्वाधिक वादळी ठरले होते. देशाचे तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने ‘जय श्रीराम’चा नारा देत राममंदिराचा मुद्दा हाती घेतला. या दोलायमान परिस्थितीत व्ही. पी. सिंग यांचे सरकार कोसळल्याने देशात मध्यवधी निवडणुका लागल्या होत्या.

नाशिकमध्ये भाजपकडून आमदार डॉ. दौलतराव आहेर हे लोकसभेचे उमेदवार होते. त्यांचा मुकाबला विद्यमान खासदार व काँग्रेसचे लोकप्रिय नेते मुरलीधर माने यांच्याशी होता. यावेळी दौलतरावांसाठी गोदाकाठच्या यशवंतराव महाराज पटांगणावर भाजप नेते व फर्डे वक्ते प्रमोद महाजन व व्यंकय्या नायडू यांची सभा झाली होती. राममंदिर मुद्यामुळे नाशिकमध्येही ‘जय श्रीराम’चा नारा गुंजत होता. सभेत राममंदिराचा मुद्दा कळीचा ठरला. सायंकाळची वेळ व शांत वाहणारी गोदामाई यांच्या साक्षीने ही सभा ऐतिहासिक ठरली होती. पटांगणावर सभेला तुफान गर्दी झाली होती.

प्रमोद महाजन यांनी त्यांच्या खास शैलीत चौफर फटकेबाजी करत विरोधकांचा समाचार घेतला होता. त्यांच्या या भाषणावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा पाऊस पाडला होता, तर व्यंकय्या नायडू यांनी ‘आगे जन पिछे महाजन’ अशी भाषणाला सुरुवात केली होती. डॉ. आहेर यांना नाशिककरांनी प्रचंड बहुमतांनी विजयी करून दिल्लीत पाठवावे, असे आवाहन या दोन्ही नेत्यांनी केले होते. त्याची परिणती म्हणजे डॉ. आहेर यांनी 30 हजार मतांनी माने यांचा पराभव करत दिल्ली गाठली होती.

लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच नाशिकमध्ये कमळ फुलले होते. तेव्हापासून भाजप नेत्यांनी नाशिकमध्ये यशवंतराव महाराज पटांगणावरच सभेचा फड गाजवण्यास प्राधान्य दिले. पुढे अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा या ठिकाणी झाल्या.

यशवंतराव महाराज पटांगणावर अनेक दिग्गज भाजप नेत्यांच्या सभा झाल्या आहेत. डॉ. दौलतराव आहेर यांच्यासाठी प्रमोद महाजन यांनी घेतलेली सभा ऐतिहासिक ठरली होती. महाजन यांची सभा म्हणजे एकप्रकारे मेजवानीच असायची.

– अरुण शेंदुर्णीकर, भाजप

LEAVE A REPLY

*