मतदारांच्या सेवेसाठी अ‍ॅम्ब्युलन्स सेवाही

0

नाशिक । प्रतिनिधीे
जिल्ह्यात तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे जिल्हावासियांच्या जिवाची लाही-लाही होत आहे. अशा वातावरणात जिल्ह्यात लोकसभेसाठी मतदान होत आहे. जिल्ह्यात तापमानाचे वाढते प्रमाण पाहता उष्माघाताबाबतच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.

त्याचप्रमाणे अ‍ॅम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध राहणार आहे. या काळात जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून जिल्ह्यातील मतदारांच्या आरोग्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य विभागावर सोपवण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व गटविकास अधिकार्‍यांशी संपर्क साधून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषदअंतर्गत येणार्‍या व मतदान केंद्रांमधील सोयीसुविधांबाबतचा आढावा घेतला. निवडणुकीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य सुविधा पुरवण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 करिता जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रांवरील अपंग, वृद्धांसाठी उतरंड असलेला जिना, पिण्याचे पाणी, मतदानासाठी आवश्यक फर्निचर, पुरेशी प्रकाश योजना व वीजपुरवठा, मदत कक्ष, योग्य चिन्ह, प्रसाधनगृह या अत्यावश्यक सुविधांचा आढावा घेतला.

यावेळी सर्व मतदान केंद्रांवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश डॉ. नरेश गिते यांनी आरोग्य विभागाला दिले. तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांच्यासह आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व सेवकांनी मुख्यालयी राहण्याचे निर्देशही दिले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे तसेच जिल्हा व तालुकास्तरीय सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

याबाबत माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी सर्व तालुक्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबतचे आदेश देण्यात आले असून प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्याचे सेवक आवश्यक औषधांसह उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे अ‍ॅम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध राहणार आहे. यावेळी उष्माघाताबाबतच्या उपाययोजनांबाबतही डॉ. डेकाटे यांनी माहिती दिली.

LEAVE A REPLY

*