पारावरच्या गप्पा । भाग-२ : मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो..

0

(पारावर सम्या, रंग्या, तान्या, बाळ्या, भग्या अन् काश्या ही तरुण पोरं मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेली )

बाळ्या : सम्या, मला हॉटस्पॉट देरे.
सम्या : अय बाळ्या शांत बस, इथं व्हाटसअपवर निवडणुकीचं वेळापत्रक आलंय, ते बघतोय (सगळेच एकदम : कधी य रे निवडणुका )

सम्या : पुढल्या महिन्यात आहेत भो…. पन काही असो, आपल्या आण्णांचीच चलती राहणार आहे.
रंग्या : सम्या आपला भाऊ बी काही कमी नाय बरका, बघितला का फेसबुक, व्हाटसअपवर सगळीकडे भाऊंचीच चर्चा आहे.
तान्या : अय हे तर काहीच नाही, आमचा उमेदवार सगळ्यात भारीय, आम्हा सगळ्यांना तो पैसे देणारये… तेवढ्यात
भग्या आणि काश्या : काय रे, झालं का तुम्हाला निमित्त… नुसते उपाशी कार्यकर्ते होऊ नका म्हणजे झालं. चला येतो आम्ही.

सम्या : आपण आपल्या उमेदवाराचं प्रचार करणार तो पण सोशल मीडियावर.
रंग्या : आमचा भाऊ बी गप बसल्यातला नाय, जोरदार तयारी चालू आहे प्रचाराची. (तेवढ्यात समोरून पाटलाचा तुक्या पारावर येताना दिसला)
तान्या : सम्या, रंग्या, तुकाराम तात्या येऊ राहिला शांत बसा

पाटलाचा तुक्या : (बूड टेकीत ) काय म तरुणमंडळी, काय चाललंय ?
बाळ्या : तात्या, काय नाय ते निवडणुका (तेवढ्यात ही मंडळी त्याला गप्प करतात.)
पाटलाचा तुक्या : पोराहो काम धंद्याकडं लक्ष द्या, कोणी पोरी देईना झालाय, अन तुमचं काय निवडणुका.
सम्या : काय नाही तात्या, ते आपल भाऊंबद्दल सांगत होतो.
पाटलाचा तुक्या : आर सम्या, हे भाऊ, अण्णा, साहेब हे फकस्त निवडणुकीपुरतं असत्यात, नंतर कुठं गायब व्हत्यात काय माहीत, आता हेच बघाना, दोन महिन्यांपूर्वी गावात एक बॅनर नव्हता, आज अख्खा गाव बॅनरखाली आलाय… (तेवढ्यात तान्या : आम्हीच लावलेत ते अण्णांचे बॅनर )

पाटलाचा तुक्या : कारं तान्या, किती शिकशान झालंय तुहं
तान्या : तात्या, बीए झालंय …
पाटलाचा तुक्या : आर मंग मास्तरांनी तुला बॅनर लावायला शिकवलं व्हय ..आर आधी पोटापाण्याची सोय करा, मग प्रचार करीत बसा … या उमेदवारांच्या पायी कितीक तरुण आज बेरोजगारीच्या विळख्यात सापडलीय.
सम्या : पर तात्या, इथं पैसाबी चांगला मिळतोय, अन् खायला चांगलं मिळतंय,
पाटलाचा तुक्या : खरं हाय तुझ सम्या, आम्हीबी तुमच्या एवढे असताना असं प्रचाराला जायचो, एक वडापाव खाऊन गावभर घोषणा देत फिरायचो, काय झालं, आल का गावात पाणी, आली का ईज, आलं का शिक शान, तुम्हाला रोजगार कोण देणार, यासाठी तरुण शिकला पायजे, कामाला लागला पाहिजे, तंव्हा गपगुमान कामाला जावा, अभ्यास करा, काय?

सम्या : तात्या, खरंच चुकलो आम्ही, अहो या प्रचारपायी लय वर्ष वाया घालवली, पण आता आम्ही तरुण पिढी देशाचा पंतप्रधान निवडणार, काय तान्या, रंग्या बरोबर ना?
रंग्या, तान्या : व्हय सम्या बरोबर म्हणतुया तू, आपल्याला रोजगार देईल, नोकर्‍या देईल, तरुणांच भविष्य घडवेल असा उमेदवार निवडून द्यायचा.
पाटलाचा तुक्या : व्हय बरोबर म्हंतायस पोरांनो, चला तर मग,
सम्या : हो चला, या लोकसभा निवडणुकीत सर्वांना सहभागी होण्यासाठी आवाहन करूया, भारताचं भविष्य उज्ज्वल करूया..
समदी मंडळी : मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो ….

(शब्दांकन : गोकुळ पवार)

LEAVE A REPLY

*