नाशिकरोड कारागृहातील कच्चे बंदी करणार मतदान

0

नाशिक । कुंदन राजपूत
न्यायालय जो पर्यंत एखाद्या गुन्ह्यात दोषी ठरवत नाही तो पर्यंत संशयित हा आरोपी नसतो. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे त्याचे हक्क अबाधित असतात. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कच्चे बंदी देखील मतदानाचा हक्क बजाविण्यास पात्र ठरतात. सद्य स्थितीत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात एक हजार 103 कच्चे बंदी आहेत. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनांनतर जिल्हा निवडणूक शाखेकडून कारागृहातील बंदींना मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या निवडणुकीस प्रारंभ झाला असून जनतेने मतदानाचा हक्क बजवावा यासाठी प्रशासनाकडून जनजागृती सुरु आहे. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये हा त्याचा मुख्य उद्देश असतो. त्याचप्रमाणे घटनेनुसार कारागृहातील कच्च्या बंदींना मतदानाचा अधिकार बहाल आहे. मात्र, न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या बंदीचा मतदानाचा अधिकार रद्द होतो.

या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेने कारागृहातील कच्च्या बंदीची माहिती तपासली जात आहे. नाशिकरोड कारागृहात सद्यस्थितीत शिक्षाबंदी, कच्च्या बंदी व स्थानबद्ध असे एकणू 3 हजार 265 कैदी आहेत. त्यापैकी कच्च्या बंदीची संख्या ही 1 हजार 103 इतकी आहे. त्यात पुुरुष बंदीची संख्या ही 1 हजार 68 तर महिला बंदीची संख्या ही 35 इतकी आहे. या प्रक्रियेत सर्वात महत्वाचे म्हणजे कच्चे बंदीच्या नावांची मतदार यादीत नोंद असली पाहिजे.

त्यानंतर जिल्हा निवडणूक शाखेकडून ही यादी निवडणूक आयोगाकडे पाठवली जाते. याबाबत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक तत्वे जारी होतील. त्यानंतर कच्चे बंदींच्या मतदान प्रक्रियेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. नाशिकरोड येथील तुरंगात यापुर्वी एकदा कच्चे बंदीसाठी पोस्टल पध्दतीने मतदान प्रक्रिया राबविण्यात आली होती.

महानिरिक्षकांची परवानगी बंधनकारक
कच्च्या बंदींना मतदान प्रक्रियेत सहभागी होता यावे ,यासाठी राज्य निवडणूक आयोगाला पुणे येथील कारागृह महानिरिक्षकांची पत्राद्वारे परवानगी घ्यावी लागते. परवानगी देताना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व बाबींचा विचार केला जातो. सुरक्षेच्या कारणास्तव बंदीना तुरुंगाबाहेर मतदान केंद्रावर नेणे शक्य नसते. त्यामुळे तुरंगात मतदान केंद्र उभारण्याची अटीशर्तीसह परवानगी दिली जाते. तसेच, पोस्टल मतदानाच्या पर्यायावर विचार केला जातो.

आ.रमेश कदमांनी केले होते मतदान
अण्णा भाऊ सांठे महामंडळात भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात असलेले व राष्ट्रवादीतून हकालपट्टी केेलेले आमदार रमेश कदम यांनी देखील विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावला होता. तसेच, अनेक लोकप्रतिनिधींनी या अगोदर कारागृहातून निवडणूक लढवली आहे.

मतदार यादीतील कच्चे बंदीची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. निवडणूक आयोगाकडून याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
– अरुण आनंदकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी

LEAVE A REPLY

*