बागलाण तालुक्यातील दसाने येथील दरोड्याचा उलगडा; ४ दरोडेखोर जेरबंद

0
सटाणा | गेल्या महिन्यात बागलाण तालुक्यातील दसाणे येथे खैरनार दांपत्यास मारहाण करून घरात बांधून ठेवत धाडसी दरोडा टाकला होता. यात १२ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पसार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर दरोडेखोरांचा तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि सटाणा पोलीस करत होते. अखेर २० दिवसांनी या प्रकरणातील चार दरोडेखोरांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि सटाणा पोलिसांना यश आले आहे.

दसाणे येथील तेलदर शिवारातील शेतकरी केवळ खैरणार हे व त्यांची पत्नी  सुशिलाबार्इ खैरणार हे झोपलेले असताना  07 ते 08 दरोडेखोरांनी दरवाजाची जाळी व कडीकोयंडा तोडून लोखंडी रॉड, लाकडी दांडके व हत्याराने मारहाण करत धमकावत अंगावरचे सोने तसेच कपाटातील रोख रक्कम असा एकूण १२ लाख ६४ हजारांचा ऐवज लुटून नेला होता.

या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक संजय
दराडे, अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेवुन पाहणी केली होती.

त्यानंतर तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या अंतर्गत तपास सूत्रे फिरवण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे व सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला.

दरोडेखोर डांगी आणि अहिराणी भाषा बोलत असल्याचे त्यांना समजले. त्यानुसार बागलाण तालुक्यातील सर्व खेडोपाडयांमध्ये गुप्त बातमीदारांकडून माहिती घेत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी सुरु केली.

त्यानंतर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सटाणा परिसरातील सोमनाथ गुलाब पवार (वय 37, रा.जाखोड,
ता.सटाणा) यास ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतर त्याला विश्वासात घेऊन औरंगाबाद जिल्हयातील गारखेडा येथील साथीदार सुनिल गोरख काळे, (वय 20) आकाश लक्ष्मण चव्हाण (वय 23) तसेच सटाणा तालुक्यातील दसाने येथील दयाराम नामदेव पवार, (वय 45) यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

दरम्यान, दसाने येथील रहिवासी दयाराम पवार हा गावातीलच रहिवाशी असून त्याला परिसरातील सर्व शेतकऱ्यांची माहिती होती. त्यानंतरचा साथीदारांच्या माध्यमातून कट रचल्याचे समोर आले आहे.

LEAVE A REPLY

*