पालकमंत्र्यांच्या राहुडे भेटीनंतर प्रशासनाची कानउघाडणी

0

नाशिक / सुरगाणा : सुरगाणा तालुक्यातील राहुडे येथील गावात अतिसाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असून पालकमंत्री गिरीश महाजन उद्या शनिवारी नाशिक दौर्‍यावर येत असून ते राहुडे गावात जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पालकमंत्र्यांच्या दौर्‍यामुळे आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.

पाणीपुरवठा करणार्‍या सार्वजनिक विहिरीतील दूषित पाणी प्यायल्याने सुरगाणा तालुक्यातील राहुडे आणि कळवण तालुक्यातील वीरशेत येथे सुमारे पावणेदोनशे नागरिक अत्यवस्थ झाले. त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून नाशिक जिल्हा रुग्णालय तसेच वणी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. तीन दिवसांत चारजणांचा यामुळे मृत्यू झाला. मात्र आरोग्य विभागाने हा मृत्यू गॅस्ट्रोने झाला नसल्याचा अहवाल देत या प्रकरणातून स्वतःची मान सोडवून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

सदर प्रकरणी ग्रामपंचायतीला दोषी ठरवण्यात आले आहे. गावात स्वच्छतेचा उडालेला बोजवारा, पाणीस्त्रोतांचे अनियमित शुद्धीकरण इत्यादी ठपका ठेवत ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद स्थायी समिती सभेतही याप्रश्नी सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

या एकूणच पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राहुडे या ठिकाणी भेट दिली. तसेच रुग्ण व मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन गावातील सार्वजनिक विहिरींची पाहणी केली. गावातील नागरिकांची विचारपूस करून तातडीने सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी जिल्हा परिषदेला दिले आहेत. प्रशासनाच्या हलगर्जीपणाला त्यांनी वेठीस धरून गावातील नागरिकांना शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा पुरवण्यास सांगितल्या आहेत. दरम्यान जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*