थांबा असूनही बस थांबत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांचा बसच्या टपावर ‘ठिय्या’

0

भऊर (वार्ताहर): सटाणा आगाराची गिरणारे -देवळा बस पिंपळगाव (वा.) येथे थांबत नसल्याने आज संतप्त विद्यार्थ्यांनी तळवाडे नाशिक बसच्या टपावर बसून देवळा नियंत्रणकक्षासमोर ठिय्या आंदोलन केल्याने एकच खळबळ उडाली होती.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, देवळा येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी पूर्व भागातील गिरणारे, कुंभार्डे, सांगवी, चिंचवे, उमराणे, खारीपाडा, दहिवड, मेशी, खडकतळे, पिंपळगाव, खुंटेवाडी व वाखारवाडी या गावातील शेकडो विद्यार्थी नियमित जा ये करतात मात्र सकाळी ६:४५ वा. पिंपळगाव येथे येणारी गिरणारे देवळा ही बस जागा नसल्याचे कारण देऊन विना थांबा निघून जाते.

त्यानंतर ७:१५ वाजेची तळवाडे नाशिक बस ही देखील निंबोळा, महालपाटणे, रणादेवपाडा येथूनच पूर्ण भरून येत असल्याने पिंपळगाव, खुंटेवाडी येथील ७० ते ८० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जागा मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आज अखेर संतप्त विद्यार्थ्यांनी बस अडवली व बसच्या टपावर चढून देवळा येथे घेऊन जाण्याचा आग्रह धरला यावेळी चालकाने प्रसंगावधान राखून विद्यार्थ्यांना देवळा येथे नेले. तेव्हा ७० ते ८० विद्यार्थ्यांनी देवळा बसस्थानकात नियंत्रण कक्षासमोर ठिय्या मांडून जादा बसची मागणी केली.

गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून शैक्षणिक नुकसान होत आहे. या बाबत अनेक वेळा तक्रार केली मात्र दखल घेतली जात नाही. दोन दिवसात विद्यार्थ्यांना जादा बस उपलब्ध करून दिली नाही तर विद्यार्थी व पालकांसह रास्ता रोको करून एकही बस जाऊ दिली जाणार नाही.
नदीश थोरात : उपसरपंच पिंपळगाव (वा.)

LEAVE A REPLY

*