जिल्ह्यात आजपासून नायलॉन मांजा बंदी; निवासी उपजिल्हाधिकार्‍यांचे फौजदारीचे आदेश

जिल्ह्यात आजपासून नायलॉन मांजा बंदी;  निवासी उपजिल्हाधिकार्‍यांचे फौजदारीचे आदेश

नाशिक । प्रतिनिधी

पंतग उडविताना नायलॉन मांज्याचा वापर वाढत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात पशू-पक्षी जखमी होऊन त्यांचा प्राण जाण्याची घटना घडतात. मनुष्याच्या जीवावर देखील नायलॉन मांजा बेतत आहे. या पार्श्वभूमीवर निवासी जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी मंगळवारी (दि.17) जिल्ह्यात नायलॉन मांजाची निर्मिती, विक्री व वापरावर बंदीचे आदेश दिले आहेत. नियमाचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाईचे आदेश देण्यात आले आहे.

संक्रातीचा सण तोंडावर आला असून पंतगबाजीला सुरुवात झाली आहे. पंतग उडविण्यासाठी नायलॉन मांज्याचा वापर दिवसेंदिवस वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. दरवर्षी जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणेकडून नायलॉन मांज्यावर बंदी घातली जाते. तरी देखील बाजारपेठते चोरट्या मार्गाने नायलॉनची विक्री केली जाते. निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी मंगळवारी पत्रकाद्वारे बंदीचे आदेश जारी केले आहेत. बुधवार (दि.18) पासून ही बंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार नायलॉन मांजा निर्मिती, विक्री व वापरावर बंदी असणार आहे. 31 जानेवारीपर्यंत ही बंदी लागू असेल. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जावे, असे आदेश यंत्रणेला देण्यात आले आहे.

नायलॉन मांजाचा वापर हा पशूपक्षांसाठी घातक ठरत आहे. त्यामुळे पशू पक्षी जखमी होऊन त्यांना प्राणास मुकावे लागते. ते बघता नायलॉन वापरावर बंदी घालण्यात आली आहे.. नियमांचे उल्लंघन केल्यास थेट फौजदारी कारवाई केली जाईल.
– भागवत डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com