कार्यक्षमता सिद्धतेसाठी मंत्र्यांची धावपळ

0
नाशिक | दि. ९ प्रतिनिधी- राज्यातील विविध निवडणुकांमध्ये भाजपची सरशी होत असली तरी राज्य सरकारचा हवा तसा प्रभाव पडत नसल्याने आता मंत्रिमंडळातील काही अकार्यक्षम मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवून नवीन चेहर्‍यांना संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याकरिता प्रत्येक मंत्र्याचे रिपोर्ट कार्ड तपासले जाणार आहे.
गुणवत्ता आणि कार्यक्षमतेच्या निकषावर हे फेरबदल होणार असल्याने आपली कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी आता मंत्र्यांनीही राज्यातील प्रत्येक विभागात बैठकांचे सत्र सुरू केल्याचे दिसून येत आहे.

नाशिकमध्ये पुढील दोन दिवसांत मंत्र्यांच्या उपस्थितीत विविध बैठका आणि कामांचे भूमिपूजन कार्यक्रमांचे आयोजन त्याचाच भाग मानण्यात येत आहे. पारदर्शकता आणि कामकाजातील गतिमानता याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत.

विशेष म्हणजे राज्यातील मंत्र्यांचा अहवाल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे दिला जातो. स्वतः मुख्यमंत्री झोकून देऊन काम करण्याच्या शैलीमुळे प्रचलित आहेत. मात्र मंंत्रिमंडळातील काही अकार्यक्षम मंत्र्यांवर फडणवीस सध्या नाराज आहेत. याकरता मंत्रिमंडळात वारंवार फेरबदलाच्या चर्चा झडत आहेत. महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी एकट्याने प्रचार यंत्रणा हाताळली होती.

त्यावेळीही त्यांनी इतर मंत्र्यांबाबत नाराजी दर्शवली होती. मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांची कामगिरी फारशी समाधानकारक नसल्याने आता मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तपासले जाणार आहे. त्यामुळे ज्यांचे रिपोर्ट कार्ड चंागले नाही त्यांची गच्छंती अटळ मानली जात आहे. म्हणूनच की काय आता मंत्र्यांनी बैठकांचा धडाका सुरू केल्याचे दिसून येत आहे. नाशिकमध्ये पुढील दोन दिवसांत मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

म्हणूनच की काय उन्हाळा संपत आलेला असताना पाणीपुरवठामंत्री टंचाई परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच  मुख्यमंत्र्यांची अभिनव योजना असलेल्या ङ्गजलयुक्तफच्या कामांचा आढावा घेऊन या कामांना गती देऊन मुख्यमंत्र्यांचे मन जिंकण्याचा प्रयत्नही या बैठकांमधून दिसून येतो. ११, १३ आणि १४ मे रोजी जिल्ह्यात विविध कामांचे भूमिपूजनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.

पाणीपुरवठा, स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत ११ मे रोजी टंचाई आढावा बैठक तसेच जिल्हा परिषदेअंतर्गत राबवण्यात येणार्‍या राष्ट्रीय पेयजल योजना, स्वच्छ भारत अभियानाचा विभागीय आढावा घेणार आहेत. १३ मे रोजी जलसंधारणमंत्री राम शिंदे मालेगाव तालुक्यातील जलसंधारण आणि जलयुक्त शिवारअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करणार आहेत.

तसेच गाळमुक्त धरण अभियानाचे उद्घाटनही त्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. तसेच नाशिक येथे जलयुक्त शिवार योजनेचा मागील तीन वर्षांचा आढावाही या बैठकीत घेण्यात येणार आहे. यानंतर १४ मे रोजी सिन्नर तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेची पाहणी ते करणार आहेत. ११ मे रोजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल टंचाई आढावा बैठकीस उपस्थित राहणार आहेत. तसेच १३ मे रोजी पर्यटन विकास विभागाची आढावा बैठक त्यांच्या उपस्थितीत होणार आहे.