Video : यशोगाथा। हौसलोसे उडान होती है… दोन मुलांची आई ते उपनिरीक्षक

Video : यशोगाथा। हौसलोसे उडान होती है… दोन मुलांची आई ते उपनिरीक्षक

अहिल्याबाई होळकर कप बेस्ट ऑलराऊंड वुमन कॅडेट व सेकंड बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅचचा मान विजया पवार यांनी पटकावला. आपल्या यशाबाबत बोलताना पवार यांनी सािंगतले, पंचवटी येथील आमचे कुटुंब. वडील प्रकाश पवार हे पशुवैद्यकीय डॉक्टर होते. 2005 मध्ये माझ्या वयाच्या 11 व्या वर्षी त्यांचे अकाली निधन झाल्यानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यात सर्वात मोठी म्हणून माझ्यावर सर्वाधिक जबाबदारी होती.

या परिस्थितीत विजयाने उमराणे (ता.देवळा) येथील विश्वासराव देवरे महाविद्यालयातून 2011 मध्ये डी.एड.ची पदवी घेतली. परंतु भरती बंद असल्याने नोकरी मिळाली नाही. यानंतर आईने आपले कर्तव्य पार पाडत विवाह करून दिला. शिक्षण पूर्ण होताच शहादा (जि.नंदुरबार) येथील आरोग्य विभागात परिचर व्यक्तीशी विवाह झाला. पती नोकरीनिमित्त देवळा तालुक्यात असल्यामुळे दोन्ही मुलांना आजीकडे ठेवून नाशिकमध्ये अभ्यास सुरू केला.

‘सेल्फ स्टडी’ करून पीएसआय परीक्षेत यश मिळवले. विशेष म्हणजे, याच परीक्षेत माझी लहान बहीण वृषाली पवार हीदेखील उत्तीर्ण झाल्यामुळे आम्हा दोघींचे प्रशिक्षण पूर्ण झाले. तिसरी बहीण जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहे. तिन्ही बहिणी शासकीय नोकरीत असल्यामुळे आईचे स्वप्न सत्यात उतरल्याचा आज मनस्वी आनंद होत आहे.

या यशात सासरच्या सर्व मंडळींचा मोठा वाटा आहे. पती, दहा वर्षांचा मुलगा वैदिक व साडेतीन वर्षांची कन्या शिवन्या यांच्यासह आई, सासू, सासरे यांनी सर्वांनी खूप कष्ट सोसून मला अभ्यासात मदत केली. पती तसेच आईचे स्वप्न पूर्ण झाल्याचा मनस्वी आनंद वाटतो.यापुढे ’यूपीएससी’च्या माध्यमातून सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न आहे.
-विजया पवार, पोलीस उपनिरीक्षक

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com