मैत्रोत्सवासाठी तरुणाईचे ‘यूथफूल’ बेत

समाज जाणिवांची किनार; निसर्गस्थळे बहरणार

0

नाशिक | दि. ४ नील कुलकर्णी
तुझ्याविना मैत्रीचा जिव्हाळा, म्हणजे माझ्यासाठी जणू उन्हाळ्यातीही पावसाळा. तुझी मैत्री म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं जाळीदार पान, जसंजसं त्याच्य आयुष्य वाढत जातं, तसंतसं त्याच्या सुंदरतेला तेज चढत जात. मैत्रीचा हा धागा असाच जपून ठेव. तू हसत रहा आणि दु:ख माझ्याआड लपून ठेव.

अशा तरल भावस्पर्शी संदेशातून ‘मैतर जीवांचे’ आपल्या भावना उद्या रविवारी(दि.५) व्यक्त करणार आहेत. त्याला निमित्तही गहिर्‍या मित्र भावनांचे आहे. ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार जगभर मैत्रदिन म्हणून साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून या दिनाचे महत्त्व तरुणाईमध्ये अधिकच वाढत आहे. वीक एन्ड आणि मस्त पावसाळी वातावरण हा योग साधून मैत्रदिनाच्या पूर्वसंध्येला शहरात युवावर्गामध्ये अधिक उत्साहाचे वातावरण दिसून आले. मैत्रदिन ‘कॅश करण्यासाठी सोशल माध्यमांवरही शुुक्रवारपासूनच मैत्रीचे संदेश व्हायरल होताना दिसले.

अमाप उत्साह आणि नवीन डेज् साजरा करणार्‍या तरुणाईमध्ये हा दिन म्हणजे मैत्रीचा महा-उत्सवच जणू. या दिनाला अविस्मरणीय करण्यासाठी कुणी निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचे बेत रचले तर कुणी मैत्रीचा धागा बांधण्यासाठी तरुणाईसाठी ‘हॉट आणि फेव्हरेट’ डेस्टिनेशन असलेल्या कॉलेजरोडवरील हॉटेल्स आणि कॉफी हाऊसचा पर्याय निवडण्याचे ठरवले आहे. यासह नाशिक शहराच्या ४०-५० किमीच्या परिघात असलेल्या अंजनेरी, पहिने, गंगापूर धरण, सोमेश्‍वर धबधबा, दुगारवाडी, भंडरदरा, चामरलेणी, पांडवलेणी टेकडी यासह अशा विविध निसर्गरम्य ठिकाणी मैत्रीच्या स्नेहसंमेलनाला बहर येत असतो. यंदाही तरुणाई मैत्रदिन साजरा करण्यासाठी याच ठिकाणावर गर्दी करणार हे नक्की.

खाऊ-पिऊ मजा करु ही तरुणाईची कुठलाही दिन साजरा करण्याची नवी व्याख्या होऊ घातली आहे. त्यामुळे तरुणाईचे ‘एव्हरग्रीन डेस्टिनेशन’ असलेल्या कॉलेजरोड, गंगापूररोड, महात्मानगरसह, मॉल्समध्ये मैत्रदिनासाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट, कॉफी हॉऊस, स्नॅक्स सेंटर यांनीही विशेष सजावट, खाद्यपदार्थ, पेय, नियोजन केलेले दिसत होते. एकूणच मैत्र दिन ‘जरा हटके’ आणि संस्मरणीय करण्यासाठी तरुणाईमध्ये अमाप उत्साह दिसून आला.

मैत्रदिन असाही……
एकीकडे तरुणाई आपल्या जीवाभावाच्या दोस्ताला मैत्रीचा धागा बांधून ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करण्यासाठी विविध बेत रचत असताना काही स्वयंसेवी संघटना मैत्रदिनाला सामाजिक बांधिलकीची किनार देणार आहे. कुणी वृक्ष, पशु-पक्षी, पर्यावरणातील विविध घटकांना आपला सच्चा सांगाती, सखा मानते त्याच्या रक्षणासाठी काम करण्याचे बेत काहींनी रचले आहेत.

जैन सोशल ग्रुप
मैत्रदिनाचे औचित्य साधून जैन सोशल ग्रुप युवा फोरम तर्फे रविवारी नवरचना शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन देण्यात येणार आहे. यासह मुलांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा आणि त्यांना नवनिर्मितीचा आनंद घेता यावा यासाठी हस्तकलेच्या वस्तु तयार करणे, नृत्य शिकवणे असे उपक्रम घेतले जाणार आहे अशी माहिती अध्यक्ष सलोनी बेदमुथा, भुपेंद्र मुनोत आणि नेहल गांधी, अक्षय गांधी यांनी दिली.

LEAVE A REPLY

*