Video: नाशिक | रुपाली गायखे : अभिनय ध्यास अन् श्वास

0

 अभिनयाचा प्रवास खडतर होता. मुंबईत गेल्यानंतर राहण्यासाठी आणि आर्थिक समस्या सोडवताना खूप संघर्ष केला. अर्थार्जनासाठी प्रिंट शूट जाहिरातीसाठी काम करून पैसा जमवला. तीन दिवस प्लॅटफॉर्मवर राहून काढावेे लागले. अभिनयाची पॅशन असल्याने छोट्या लढाई लढताना हारणार नाही ही खूणगाठ मनाशी पक्की बांधली. कारण महासंग्राम तर अजून लढणे बाकी आहे. ध्येयाचा ध्यास असला की समस्या, संघर्ष लढण्याचे बळ येते.

  माझ्या घरात अभिनय क्षेत्रात कुणीही नाही. तरीही शालेय जीवनात प्रथम बालनाट्यातून अभिनयात पहिले पाऊल पडले. महाविद्यालयीन जीवनात सूत्रसंचालन करणे, नृत्य, नाट्य, अभिनय, एनएसएस उपक्रम अशा विविध क्षेत्रात मी सक्रिय सहभाग घेत गेले.

नाना देवरे यांच्यामुळे मला नाटकात काम करण्याची संधी मिळाली. राज्य नाट्य स्पर्धा, कामगार नाट्य स्पर्धेत महत्त्वाच्या भूमिकांसाठी अभिनय केला. दरम्यान, ‘महिमा ये जगदंबेचा’ या फिचर फिल्ममध्ये कामाची संधी मिळाली. सदाशिव अमरापूरकर यांच्यासोबत कामाचा अनुभव घेतला. मुरळी, कोण हसले आपल्याला, का वाचवलंस मला, भागी, रसिक अशा नाट्य स्पर्धेतून काम केले. कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत सखाराम बायंडर या नाटकात मी केलेल्या भूमिकेबद्दल अभिनयासाठी पहिले पारितोषिक मिळाले.

‘असं सासर सुरेख बाई’ या दूरचित्रवाणीवरील मालिकेत येण्याची प्रथम संधी मिळाली. त्यानंतर लगेचच ‘जय मल्हार’मध्ये म्हाळसाच्या दासीची दीर्घ भूमिका मिळाली. दरम्यान, परिचयमध्येही अभिनय केला. दूरदर्शनवरील संस्कृती या हिंदी मालिकेत मला मुख्य भूमिकेत काम करता आले. हिंदी मालिकांचा हा अनुभव खूप शिकवून गेला. मात्र इथवरची वाटचाल सोपी नव्हती.

मुंबईत गेल्यानंतर राहण्याचा प्रश्न बिकट होता. आर्थिक समस्या सोडवताना दमछाक होत होती. त्या काळात अर्थार्जनासाठी प्रिंट शूट जाहिरातीसाठी काम करून पैसा जमवला. दरम्यान, तीन दिवस प्लॅटफॉर्मवर राहून काढावे लागले. अभिनयाची पॅशन असल्याने या छोट्या लढया लढताना हार मानणार नाही ही खूणगाठ मनाशी पक्की बांधली. ध्येयाचा ध्यास असला की समस्या, संघर्ष पेलण्याचे बळ येते. माझेही तसेच झाले.

अल्पावधीत मी सर्व समस्यांवर मात केली. त्यासाठी ‘कन्हैया’ या नाटकाची संधी मला आर्थिक स्थैर्य देणारी ठरली. दरम्यान, ‘जोर लगाके हय्या’ आणि ‘चावट शेजारी’ अशा व्यावसायिक नाटकांचा अनुभव अभिनयात खूप काही शिकवून गेला. माणसाने समस्या, संघर्षातही स्थिर आणि शांत राहून मार्ग काढला पाहिजे, असे मला वाटते. तेच आजवर मी करत आले आहे.

मी संगीत आणि नृत्यातून तणावाचे नियोजन करते. वाचनाने आयुष्य समृद्ध होते. ज्या जगात आपल्याला या जन्मात जाता येणार नाही, जे करिअर, विश्व आपण कधीच पाहू शकत नाही ते जग, ती सच्ची अनुभूती वाचनातून मिळते. मी पुस्तकांना माझा सच्चा सोबती मानते. ‘हुमान’ या पुस्तकाने खूप शिकवले. त्याच्यातून वाचलेल्या संघर्षापेक्षा मला माझ्या जीवनाचा संघर्ष थिटा वाटला. त्यासह डॉ. मोहन जोशी यांचे चमचमणारे तारे या पुस्तकाने मला खूप शिकवलेे. वाचनाने अनुभव विश्व तर समृद्ध होतेेच शिवाय शब्दसंग्रह वाढतो. माझी स्मरणशक्ती, वाचनाची आवड आणि माणसे जोडत जाण्याचे कसब माझ्या करिअरमध्ये खूप महत्त्वपूर्ण ठरत आहे. नाशिककर आपल्या शहरातील मातीत घडलेल्या कलाकारांना खूप प्रेम, सन्मान देतात. असा सन्मान मला आजवर मिळत आहे.

अभिनयाचे क्षेत्र हे ग्लॅमरचे जग आहे. येथील गणिते दिवसाला बदलतात. त्यामुळे येथे टिकून राहायाचे असेल तर अविरत अन् योग्य मेहनतीला पर्याय नाही. तुम्ही जे काम कराल त्यामध्ये स्वत:ला झोकून देता आले पाहिजे. यशाला शॉर्टकट नसतो. त्यामुळे जे काही क्षेत्र निवडाल त्यामध्ये प्रामाणिकपणे आणि नीतिमत्तेतेने काम केले पाहिजे. त्यामुळे यश उशिरा मिळते, परंतु ते शाश्वत टिकते.

भविष्यात जेव्हा मी मोठी होईल तेव्हा मुंबईमध्ये नाशिकसह छोट्या शहरातून आलेल्या कलाकारांना मदतीचा हात देईल. कारण अभिनय, मालिका या क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करताना काय संघर्ष करावा लागतो हे मी अनुभवले आहे. त्यामुळे मी जर रसिकांच्या पाठबळाने ‘मोठी’ झाले तर नाशिककर नवोदित कलाकारांना मोठे करण्यासाठी बांधिल राहील.
नाशिकमध्ये अत्यंत बुद्धिवान, सर्जनशील आणि मेहनती कलाकार आहेत. तरीही आपल्याकडे कलेच्या क्षेत्रात काम करणार्‍यांना वेळेचे भान अभावानेच दिसते.

नाशिकमध्ये निर्माते-कलाकार म्हटले की तिथे वेळखाऊ शूटिंंग, व्यावसायिक मूल्यांचा अभाव अशी जी आपली प्रतिमा तयार होते ती पूर्णपणे पुसली जावी. त्यासाठी नवे कलाकार, निर्मात्यांनी वेळ, व्यावसायिक मूल्ये आणि मुंबईत असलेले कलेतील नवे प्रवाह आत्मसात करावे, असे मला वाटते. बाकी अभिनय, सर्जनशील ‘टॅलेन्ट’ आपल्यात आहेच.

असे जर झाले तर मुंबईनंंतर नाशिक नाट्य, चित्रपटांची राजधानी होण्याचा दिवस दूर नाही. कलाकाराने चांगल्या मार्गाने यश संपादन करावे, मात्र ग्लॅमरच्या जगात प्रवेश करताना स्वत:ला आरशात बघताना मान खाली घालण्याची वेळ येऊ नये, असे काम करावे. नव्या कलाकारांना मालिका, चित्रवाहिन्या, वेबसीरिज, नाटके आणि एकूणच नव्या माध्यमांमुळे खूप मोठ्या करिअर संधी आहेत. मात्र जे सकस, दर्जेदार आणि खणखणीत आहे त्यालाच प्रेक्षक स्वीकारतात.

येणार्‍या काही दिवसांत मी दोन नव्या मराठी चित्रटांत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दोन अल्बम सॉग्जही प्रदर्शित होत आहेत. यासह जाहिरातपट, काही डेली सोप्स (मालिका) माझ्या हातात आहेत. अभिनयातून रसिकांशी संवाद साधणे ही माझी पॅशन, ध्यास अन् श्वास झाली आहे.

( शब्दांकन : नील कुलकर्णी )

 पुढील अंकात – प्राजक्त देशमुख (नाट्य)

LEAVE A REPLY

*