नाशिक | प्राजक्त देशमुख : नाटक हीच माझी ‘जीविका’(कला आणि संस्कृती )

0

माणसाचे जगणे महत्त्वाचे. आवडत्या कामातून हे जगणे गवसते. स्वत:ला विसरायला लावणार्‍या गोष्टीतून आनंद, समाधान मिळते ती जीविका व्हावी. ‘उप’जीविकेला मुख्य जीविका न मानता माणसाला आपल्या जीविका(जगणं)शोधता आले, तर अवघे जगणेच उत्सव होईल. असा उत्सव प्रत्येक क्षणात शोधत क्षणोक्षणी विलक्षण आनंदाची बेटे गवसतील. जगण्यातला असा ‘झिस्ट’ ज्याला शोधता आला, त्याचे जगणे आनंदोत्सवच. त्या अर्थाने माझ्यासाठी नाटक, लेखन-दिग्दर्शन, कविता हेच जगणें (जीविका) आहे.

बालपणापासून मी जरा खोडकर स्वभावाचा. त्यावेळी पाहुण्यांच्या नकला करत. परंतु अभिनय, नाटकात प्रवेश करेल, असे कधीच निश्चित नव्हते. नक्कल कलेला पुढे दिशा आणि रूप मिळाले. दहावी-अकरावीला असताना, श्रीपाद देशपांडे नाटकात काम करत. त्याच्यासोबत राहून नाटकात रस निर्माण झाला. त्यानंतर श्रीपाद, प्रणव प्रभाकर आणि मी अश्वमेध नाट्यसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली.

आम्ही आपल्या क्षेत्रातील काम करून नाटकाची आवड जोपासू लागलो.अत्यंत वेगळी नाटके देणारी संस्था म्हणून ‘अश्वमेध’ची ओळख निर्माण झाली. ‘अश्वमेध’ पुरते मर्यादित न राहता, आम्ही व्यापक होत गेलो. सचिन शिंदे यांनी ‘हंडाभर चांदण्या’मध्ये काम करणासाठी विचारणा केली. नाटकाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून या नाटकातून जमा झालेला निधी भीषण पाणीटंचाईच्या झळा सोसणार्‍या गावापर्यंत पोहचला. कलाकार म्हणून सामाजिक कार्यात योगदान देता आले, याचे समाधान वाटते. ‘हंडाभर’ने अधिक चांगली ओळख मिळाली.

दिल्लीच्या एनएसडीतर्फे ‘भारंगम्’ 19 व्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात ‘हंडाभर’ ची निवड झाली आणि तिथेही ती रसिकांच्या कौतुकास पात्र ठरली. पाटण्यालाही हाच अनुभव आम्ही घेतला.
दरम्यान, गुजरातमध्ये कृषीपदवी घेत असताना मी एकाकी झालो आणि त्यादरम्यान वाचन वाढले. पुुस्तक वाचनातील गंमत गवसली. कविता लिखाणात माझी रुची होतीच, पण नाट्यलेखन प्रवासात आनंद ओक यांचे नाव प्राधान्याने घेतो. त्यांच्या प्रेरणेमुळे मी संगीत एकांकिका लिहिण्यासाठी सरसावलो.

‘इन सर्च ऑफ विठ्ठल ’ ह्या लघुपटासाठी संत तुकाराम अभ्यासले. त्यामुळे तुकारामांवर संगीत देवबाभळी लिहिलं. ‘भद्रकाली’ च्या प्रसाद कांबळी यांनी हे नाटक व्यावसायिक करता येईल का, अशी विचारणा केली आणि माझे पहिले व्यावसायिक नाटक  रंगभूमीवर आले. पदार्पणातच या नाटकाने इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या सर्व पुरस्कारांवर नाव कोरले. मराठी, हिंदी सिने-नाट्य क्षेत्रातील जवळपास सर्वच दिग्गज, कलाकार, दिग्दर्शक, अभिनेत्यांनी ‘देवबाभळी’ नाटकाविषयी गौरवोद्गार काढले. सिने-नाट्य क्षेत्रातील दिग्गजांशी वैयक्तिक संबंध प्रस्थापित झाले. ‘देवबाभळी’ ने मला काय दिले, हे सांगण्यासाठी शब्द आजतरी माझ्याजवळ नाही.

कामातून मिळणारा आनंद केंद्रस्थानी आहे, परंतु बाकी सर्व गोष्टी ‘कोप्रोडक्ट’ आहे, असे मला वाटते. मी 15 वर्षांपासून नाट्यलेखन, दिग्दर्शन आणि अभिनयात आहे. कवितेचीही उत्तम आवड आहे. माझा स्वभाव अंतर्मुख. स्वत:च्या जगात राहणारा, फारसा संवादी नसलेला असा मी, नाट्य-काव्य लेखनातून अभिव्यक्त होत जातो. नाटक लिहिणे किंवा दिग्दर्शन ही आनंददायी प्रक्रिया असते. नाटकासाठी विषय, आशय, संवाद लिखाण हे संकटच. परंतु ही सर्जनशील चैतन्यशील संकटे ओढावून घेणे मला आवडतात. ती पार केल्यानंतर मिळणारा आनंद विलक्षणच. अशी संकटे मी एन्जॉय करतो.

संत तुकाराम यांच्यावरील नव्या चित्रपटासाठी सध्या मी काम करतोय. काही व्यावसायिक नाटकासाठी लिखाण आणि दिग्दर्शनाची कामेही मला मिळाली आहेत. ‘देवबाभळी’मुळे व्यावसायिक पातळीवर पोहचताना आज रसिकांना मी दिग्दर्शक, लेखक म्हणून जास्त परिचित आहे. मात्र, नाशिकबाहेर माझ्यातील अभिनेता लोकांना माहीत नाही. हा पैलू मला अधिकच विकसित करायाचा आहे.

एकटे फिरणे हा माझा छंद आहे. एकांतातून मला नवे सूचत जाते. त्यामुळे कधी कामातून सुटी मिळाली की, मी स्वत:ला खोलीत बंद करून वाचन करतो. रेनमेकर आणि इतर एकांकिका हे माझे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. आजवर नाट्यप्रवासात महाराष्ट्र शासनाच्या पारितोषिकांसह एकूण सर्वाधिक म्हणजे 37 पुरस्कार प्राप्त केलेत. यासाठी कुठली पुण्याई कामी येत आहे, मला माहीत नाही, परंतु हे सर्व मी ‘बायप्रोडक्ट’ मानतो. कामातून मिळणारा आनंद हे मुख्य पारितोषिक आहे. व्यवसाय सांभाळून मी नाटकासाठी वेळ देत हाच आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतो.

ज्या क्षेत्रात काम करायचे, त्याचा संपूर्ण अभ्यास करावा. उथळ असे काही नसावे, खोलात शिरून त्यातील सखोल ज्ञान मिळवावे. चांगले वाचन करावे. जे काही कराल ते अत्यंत ‘फोकस्ड्’ राहून करावे. जी कृती, नवनिर्मिती करणार आहोत; जे काम करणार आहोत, ती करण्याआधी ज्या लोकांंनी त्या क्षेत्रात पूर्वी प्रयोग केले, त्याचा अभ्यास करूनच, मग आपण त्या क्षेत्रात उतरावे. त्यानंतर जो आनंद मिळेल, तो शब्दातीत असतो. तुम्हाला शंभर चुका माफ आहेत, परंतु त्यातली एकाचीही पुनरावृत्ती व्हायला नको, असा संदेश वडिलांनी दिला हाच मी तरुणाईपर्यंत पोहचवत आहे.

माणसाचे जगणे महत्त्वाचे. आवडत्या कामातून हे जगणे गवसते, त्यातून मिळणारा आनंद, समाधान महत्त्वाचा. मात्र, लोक चरितार्थ-उपजीविकेलाच मुख्य जीविका मानतात. त्या केवळ ‘उप’जीविका आहेत. त्यांना मोठे न मानता मुख्य जीविका माणसाला शोधता आली, तर त्याचे जगणे उत्सव होईल. जगण्यातला हा उत्सव प्रत्येक क्षणात शोधत, जीवनात क्षणोक्षणी विलक्षण आनंदाची बेटे गवसतील; असा आनंद एखाद्या नर्तकीला नर्तनातून, चित्रकाराला चित्रातून, अभिनेत्याला अभिनयातून मिळतो. त्यामुळे जे आवडते, ज्ंंयातून स्वानंद मिळतो ते जगण्याचे मुख्य साधन व्हावे, जगण्यातला असा ‘झिस्ट’ ज्याला शोधता आला त्याचे अवघे जगणेच आनंदोत्सव होईल. त्या अर्थाने माझ्यासाठी लेखन -दिग्दर्शन, नाटक, कविता हेच जगणं (जीविका)आहे.

( शब्दांकन : नील कुलकर्णी )

पुढील मुलाखत  – विठ्ठल वाळके (कृषी)

LEAVE A REPLY

*