मराठी अक्षरांचा ‘सु’लेखनकार

0

नाशिक : सोशल मीडियाच्या माध्यमातून कॅलिग्राफी महाराष्ट्रासह दुबई, युरोप, जर्मनीपर्यंत पोहोचवली आहे नाशिकरोड येथील एका युवकाने. सचिन गडाख असे या कलाकाराचे नाव असून, लहानपणापासून कागदावर रेखाक्षरे गिरवण्याचा छंद जडलेल्या सचिनने कॅलिग्राफीद्वारे (सुलेखनाद्वारे) करिअरला नवदिशा दिली. छंदाची जोपासना करण्याबरोबरच व्यवसायात प्रगती करणारा सचिन कॅलिग्राफीचा आयकॉन ठरला.

वाणिज्य शाखेचा पदवीधर असलेल्या सचिनचे बालपण नाशिकरोड येथे गेले. वडिलांनी रिक्षा चालवून सचिनसह दोन बहिणींचे शिक्षण पूर्ण केले. शालेय गरजा भागवताना वडिलांना होणारा त्रास सचिनने पाहिला. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करून कुटुंबाला हातभार लावण्याच्या हेतूने उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावाला न जाता स्क्रीन प्रिटिंगचे काम केले.

कालांतराने या व्यवसायात जम बसू लागल्याने स्वत: संगणक शिकून डिझाइन बनवू लागला. डिजिटल फोरकलर प्रिटिंगद्वारे पेन, किचन यावर डिझाइन केल्या. सोशल मीडियाचा (यू-ट्युब) वापर करून ज्ञान वाढवले.
2011 साली ‘जी महाराष्ट्र’ या नावाने व्यावसायिक डिझाइनिंगचे काम सुरू केले.

त्याद्वारे सचिनने लोगो डिझायनिंग, बोर्डस्, वेब विकसन, अँड्राईंड अ‍ॅप्सनिर्मिती, जाहिरात डिझायनिंग, चित्रपटांचे शीर्षक, व्हिडीओ इफेक्टस्, अ‍ॅनिमेशन यांची सेवा सुरू केली. हिंदी, मराठी चित्रपट तसेच मालिकांच्या नावांचीही कॅलिग्राफीही त्याने केली आहे.

सचिनने सर्व इंटरनेटद्वारे, यू-ट्युबच्या माध्यमातून शिकत बदलत्या काळात आपली वेगळी ओळख निर्माण केली. यू-ट्युबला आपला गुरू मानत फेसबुकवर रेखाक्षरे नावाचे पेज तयार करून कुंचल्याची जादू नाशिकसह मुंबई, पुणे, औरंगाबाद, सुरत, अहमदाबाद, राजस्थान यासारख्या मोठ्या शहरात पोहोचवली. आजमितीला युरोप, जर्मनी, युएईसारख्या देशात ऑनलाइन डिझायनिंग कामे करीत आहे. त्याचबरोबर घरच्या सर्व सदस्यांना कॅलिग्राफी शिकवून त्यांना सृजनशीलतेचे बाळकडू दिले आहे. ‘असेन मी, नसेल मी, अक्षरातून दिसेल मी..!’ या उक्तीप्रमाणे तरुणाईला या क्षेत्राकडे वळविण्याचा तो प्रयत्न करत आहे.

..तर माणूस नक्की यशस्वी होतो
शालेय वयात फलकलेखनाच्या माध्यमातून सुलेखनाचे कौशल्य वृद्धिंगत केले. शाईपेनची कटनिफ, बोरुच्या सहाय्याने सराव केला. यू-ट्युबवरील कॅलिग्राफीचे व्हिडीओ पाहून प्रभावित होत. कॅलिग्राफी, संगणकाच्या सहाय्याने स्वत:च वेगवेगळ्या शैलीत रेखाक्षरे तयार करत गेलो. सर्वसामान्य परिस्थितीत जीवन जगताना संघर्ष करावाच लागतो. मात्र, छंद जोपासून व्यवसाय निवडल्यास माणूस नक्कीच यशस्वी होतो.
– सचिन गडाख, सुलेखनकार विद्यार्थ्यांसाठी मोफत कॅलिग्राफी प्रशिक्षण

विद्यार्थ्यांनी कॅलिग्राफी या कलेकडे करिअरचे नवे आधुनिक क्षेत्र म्हणून पाहावे, यासाठी ‘जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त’ बिटको महाविद्यालयाच्या प्रांगणात हस्ताक्षर दिन उपक्रम राबवला. सुंदर हस्ताक्षर कसे काढावे, याबाबत प्रात्याक्षिकांसह मार्गदर्शक केले. गरजु विद्यार्थ्यांना सुलेखन कसे करावे, तसेच डिजिटल कॅलिग्राफीचा वापर कसा करावा, याचे मोफत प्रशिक्षणही देत आहे.

शब्दांकन : अशोक आढाव

LEAVE A REPLY

*