घंटागाडीचा मुकादम म्हणतो, ‘हा एरिया माझा, माझी वरिष्ठांकडे तक्रार का केली?’

0

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक, ता. २२ : स्वच्छ शहरांच्या बाबतीत नाशिक शहराचा क्रमांक देशात १५८ पर्यंत खाली घसरल्यावर महापौर आणि प्रशासनासह सर्वांना खडबडून जाग आली खरी, पण त्यानंतरही ठेकेदारांची मुजोरी काही कमी झालेली नाही.

घंटागाडी येत नाही? अशी तक्रार करणाऱ्या जागृत नाशिककर नागरिकांवर दबाव टाकण्यापर्यंत मजल ठेकेदार आणि त्याच्या कर्मचाऱ्यांची गेली आहे.

सातपूर प्रभागातील ध्रुवनगर, धर्माजी कॉलनी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून घंटागाडी अनियमित येते, तर काही भागात घंटागाडी अजिबातच फिरकत नाही.

यासंदर्भात ध्रुवनगर येथील एका रहिवाशाने सातपूरचे स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्याकडे दूरध्वनीद्वारे तक्रार नोंदविली. मात्र त्याचा परिणाम उलटाच झाला.

घंटागाडी आली खरी, पण काही मदन देव नावाचा मुकादम संबंधित नागरिकाच्या दारात हजर झाला. मी या एरियात जन्मापासून राहतो, नगरसेवकापर्यंत माझे संबंध आहेत, तुम्ही माझी तक्रार कशी केली?  बाकी कुणाचीच तक्रार कशी आली नाही? आदी गोष्टी बोलून तक्रारदार नागरिकावर त्याने दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

यासंदर्भात देशदूतने स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांना संपर्क केला असता, त्यांने संबंधित माणूस महापालिका कर्मचारी नसल्याचे सांगितले. यासंदर्भात अधिक चौकशी केली तेव्हा तो ठेकेदाराचा मुकादम असल्याचे स्पष्ट झाले. या परिसरात आसिफ अली नावाच्या व्यक्तीचा घंटागाडी ठेका असून त्याच्याकडे तो कर्मचारी कामाला असल्याचे समजते.

नाशिक शहराचा स्वच्छता प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती, तेव्हा त्यांना त्यात अनेक त्रुटी दिसून आल्या.

त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांसह संबंधित विभागासह यावर तातडीने उपाय करण्याचे आदेश दिले. दरम्यान देशदूत सह इतर माध्यमांनीही नाशिकच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करून या प्रश्नावर जागृती करून नागरिकांना पुढे येण्याचे व तक्रारी करण्याचे आवाहन केले.

त्यानंतर काही जागृत नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या. ध्रुवनगर परिसरातील नागरिकांनी अशीच तक्रार दिल्यानंतर त्याची दखल घेण्याऐवजी घंटागाडी ठेकेदाराचा मुकादम ‘तक्रार का केली? म्हणून थेट नागरिकाच्या घरी पोहोचला.

तेव्हा आपणच भरलेल्या करातून महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदाराचा पगार निघत असताना घंटागाडी ठेकेदारांची आणि त्यावरील कर्मचाऱ्यांची मुजोरी कोणत्या स्तराला पोहोचली आहे, याचा प्रत्यय संबंधित नाशिककराला आला.

Blog : दारी येता घंटागाडी घणाणा, त्यालाच दिवाळी दसरा म्हणाना ।।

LEAVE A REPLY

*