नाशिक जिल्ह्यात यंदा 14 लाख 63 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट

0

नाशिक, दि.4, प्रतिनिधी

जुलै महिन्याच्या सुरुवातीला शासनाकडून वृक्षलागवड मोहीम यंदा मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येणार आहे. त्यासाठी नुकतीच मुंबईत बैठक घेण्यात येऊन राज्यातील वृक्षलागवडीचा आढावा घेण्यात आला. राज्यात 4 कोटी तर नाशिक जिल्ह्यात 14 लाख 63 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे.

वनविभागामार्फत वृक्षलागवडीची तयारी सुरू असून, आतापर्यंत शासकीय रोपवाटिकांमध्ये 1 कोटी 10 लाख रोपे तयार करण्यात आलेली आहेत. त्यातील 14 लाख 63 हजार रोपे यंदाच्या वृक्षारोपणासाठी वापरण्यात येणार आहे. वृक्षलागवडीसाठी स्थानिक प्रजातींतील कडुनिंब, आंबा, खैर, बाबूळ, आवळा, अंजन झाडे लावण्यात येणार आहेत.

वनविभागासह, ग्रामपंचायत विभाग व शासनाच्या अन्य विभागाना या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यासाठी सूक्ष्म नियोजन जिल्हाधिकार्‍यांच्या पातळीवर सुरू आहे.

वृक्षलागवडीसंदर्भात 8 मे रोजी व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे महसूल व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे राज्याचा आढावा घेणार असून त्यानंतर 1 जून रोजी ते नाशिक जिल्ह्यात आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, वनविभाग अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. 1 ते 7 जुलै असे सात दिवस वृक्षारोपणाची मोहीम सुरू राहणार आहे. त्यात जास्तीत जास्त नागरिकांना, शासकीय अधिकार्‍यांना, कर्मचार्‍याना सामावून घेण्याचे उद्दिष्ट आहे.

याबाबत जिल्हाधिकारी, वनविभाग नियोजनात व्यस्त आहेत. जास्तीत जास्त संस्थांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. कोणत्या भागात वृक्षलागवडीची जास्त आवश्यकता आहे त्याचा आढावादेखील घेतला जात आहे.

वृक्षलागवडीची मोहिम यंदा फत्ते करण्याचा विचार वनविभाग करीत असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात अधिकारी वर्ग व्यस्त आहे.

LEAVE A REPLY

*