जिल्हा बँकेमुळे चार लाख बालकांची उपासमार!

0

नाशिक । दि. 4 प्रतिनिधी

जिल्हा परिषदेचे 120 कोटी रुपये जिल्हा बँकेत अडकल्याने प्रत्येक दिवशी त्याचे विपरित परिणाम समोर येऊ लागले आहे.

जिल्ह्यातील चार हजार अंगणवाड्यांतील 4लाख 11 हजार बालकांना अंडी आणि केळी या अमृत पोषण आहारांसाठी जि.प.ने जिल्हा बँकेत वर्ग केलेले एक कोटी रुपये जिल्हा बँकेत वर्ग केलेले आहे.

मात्र, अंगणवाड्यांना हे पैसे जिल्हा बँकेतून मिळत नसल्याने पोषण आहारा अभावी बालके उपाशी राहण्याची वेळ आली आहे.

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाकडून अंगणवाड्यांमध्ये बालकांचे आरोग्य सुदृढ व्हावे, तसेच त्यांच्या पोषणासाठी सकस आहार मिळावा म्हणून अमृत पोषण आहार, या योजनेतंर्गत जिल्ह्यातील 4 हजारापेक्षा अधिक अंगणवाड्यातील 4 लाख 11 हजार बालकांना अंडी आणि केळी हा आहार देण्यात येतो.

त्यासाठी पोषण आहार समितीत असलेल्या गावाचे सरपंच आणि अंगणवाडी सेविकांच्या नावाने जिल्हाबँकेच्या विविध शाखांमध्ये जिल्हा परिषदेने खाते उघडून पैसे थेट खात्यांवर वर्ग करण्याची व्यवस्था केलेली आहे.

हे पैसे खात्यावर वर्ग झाले की, अंगणवाडी सेविका बचतगटांच्या माध्यमातून बालकांना आवश्यक असलेल्या केळी आणि अंड्यांची खरेदी करून ठेवतात. चार-पाच दिवस पुरेल एवढा साठा केला जातो.

जिल्हा बँकेत मार्च अखेरीस अमृत पोषण आहार समित्यांना पैसे वर्ग करण्यासाठी जिल्हा परिषदेने 1 कोटी रुपये वर्ग केलेले होते. मात्र, हे पैसे मिळत नसल्याची ओरड अंगणवाड्यांनी केली आहे.

त्याचबरोबर खात्यात पैसे असताना ते का मिळत नाहीत, याचा उलगडाही होत नसल्याने अंगणवाड्यातील बालकांना पोषण आहार मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

बालकांची उपासमारी होऊ नये म्हणून अंगणवाडीसेविकांनी पदरमोड करून सुरवातीला काही दिवस आहाराचे साहित्य खरेदी करून गैरसुविधा टाळलेली होती.

पोषण आहार समितीच्या खात्यातून पैसे काढून नंतर हे पैसे आपल्याला मिळवता येतील, अशी धारणा त्यामागे होती. पण, बँकेतून पैसे मिळण्याचे ठप्प झाल्याने पदरमोडीची झळ अंगणवाडी सेविकांना चांगलीच बसली आहे.

त्याचबरोबर रखडलेले मानधन, आहाराच्या खरेदीतील मोबदला आणि इतर खर्चाचे पैसे जिल्हा बँकेत रखडलेले असल्याने अमृत पोषण आहार समित्यांनी महिला व बाल कल्याण समित्यांकडे जिल्हा बँकेतून पैसे मिळत नसल्याची तक्रार केली आहे.

LEAVE A REPLY

*