तापमानासोबतच आता जिल्हयात टँकरनेही गाठली चाळीशी

0

नाशिक । दि. 4 प्रतिनिधी

उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे ग्रामीण भागात पिण्यासाठी तसेच जनावरांसाठी पाण्याची मागणी वाढू लागली असून, लोकप्रतिनिधींच्या मागणीमुळे अखेर प्रशासनाने आज 16 टॅँकर मंजूर केल्याने जिल्हयात 40 टॅँकरद्वारे पाणी पूरवठा करण्यात येत आहे. आज 25 गावे, 16 वाड्यांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

नाशिक जिल्हयात गेल्या आठवड्यापासून तपमानात कमालीची वाढ झाली असून, ग्रामीण भागातील नद्या, नाले कोरडे पडले तर विहिरींनीही तळ गाठला आहे. अशा परिस्थितीत पाण्याची मागणी वाढली असून, पिण्यासाठी तसेच जनावरांसाठी पाणी मिळावे यासाठी गावोगावी स्थानिक नागरिकांकडून आंदोलने केली जात आहेत. एक तर धरणांतून पाणी सोडा किंवा टॅँकर तरी सुरू करा यासाठी लोकप्रतिनिधींवर दबाव टाकला जात आहे.

काही ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर पायपीट करावी लागत असून, पाणीपुरवठा योजनाही कोरड्या पडल्या आहेत. अशा परिस्थितीत पाण्यासाठी नागरिकांची भटकंती टाळण्यासाठी टॅँकरची मागणी वाढली आहे.

लोकप्रतिनिधींकडून पाणी सोडण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढवल्याने अखेर पुनद आणि चणकापूर, पालखेड , दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गेल्या आठवड्यापर्यंत 24 टॅँकरद्वारे जिल्हयातील टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठा केला जात होता. मात्र आज एकाच दिवसात 16 टँकरचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

यात चांदवड, पेठ, त्र्यंबकेश्वर, येवला, बागलाण आदि तालुक्यांना टँकर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे टॅँकरच्या संख्येने चाळीशी गाठली आहे.

LEAVE A REPLY

*