माणिकराव कोकाटे यांच्या कल्पकतेला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील : सिन्नर तालुक्यात होणार भविष्यात हजारो हेक्टरला पाणी पुरवठा

0
मुंबई : (प्रतिनिधी)  नागपुर – मुंबई समृद्धी हायवेचे काम सुरू करतांना हायवेच्या आजुबाजुच्या वीस किलोमीटर परिसरातील एम आय टँक, गावतळी व धरणातील माती व मुरूम काढण्यास शासनाने मान्यता द्यावी ही माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी मान्य करून तशा आशयाच्या सूचना संबंधित खात्याला दिल्याने भविष्यात सिन्नर तालुक्यातील हजारो एकर जमीन ओलीताखाली येणार आहे.

मुख्यमंत्र्यांचे आदेश अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांना देण्यात आले असून त्या आदेशाची प्रत तातडीने श्री.कोकाटे यांना देण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नागपूर-मुंबई हायवेचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठीचा रस्ता जमीनीपासून तीन मीटर उंचीवरून जाणार आहे. त्याकरिता फार मोठ्या प्रमाणावर मुरूम व माती लागणार आहे. परंतु, जर हायवेच्या आजूबाजूच्या वीस किलोमीटर अंतरातील धरणे, एम आय टँक, पाझर तलाव, गांवतळी, यातून मोठ्या प्रमाणावर रस्त्यालायक माती आणि मुरूम टाकण्याची अट टाकली व त्यांना शासनाकडून वसूल करण्यात येणा-या रॉयल्टीमध्ये (स्वामित्व धन ) सवलत देवून सर्व मटेरिअल काढले, तर सिन्नर तालुक्यालाच नव्हे तर राज्यातील हायवेलगतच्या गावांना त्याचा फायदा होवू शकेल.

कारण एम आय टँक, पाझर तलाव, गांवतळी, धरणातील साठवण क्षमता प्रचंड प्रमाणात वाढेल. त्याचप्रमाणे डोंगर व उंच टेकड्यांचे उत्खनन करण्याची गरज भासणार नाही. त्याचप्रमाणे जलसंधारणाच्या दृष्टीने मोठा कार्यक्रम राबविल्याने जलसंधारणाला फायदा होवून शेतक-यांची गाळ उपसा करण्याची मागणीदेखील पूर्ण होईल. जास्त पाणी साठल्याचा शेतक-यांनाही त्याचा फायदा होईल.

व्यावहारिक कल्पना असल्याचे लक्षात आल्याने याबाबतचे आदेश बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना तातडीने देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची बुधवारी मंत्रीमंडळाची बैठक संपताच माणिकराव कोकाटे यांनी तालुक्यातील शेकडो शेतक-यांसह भेट घेतली.

यावेळी त्यांनी दिलेल्या पत्राचा आशय पाहून मुख्यमंत्र्यांनी तातडीने आदेश दिले. यावेळी कोकाटे यांनी मुख्यमंत्री व यावेळी उपस्थित मंत्रीगण एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व शासकीय अधिका-यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

*