पाचशे चिमुकल्यांनी घडविले शाडू मातीचे गणराय

रोटरीच्या माध्यमातून कार्यशाळा

0
नाशिक : प्लाटर ऑफ पॅरिसमुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी एक पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून गेल्या काही वर्षांपासून शाडू मातीचे गणपती घरोघरी बसविण्यास सुरुवात झाली आहे. पर्यावरण रक्षणात आपलाही हातभार लागावा म्हणून ‘रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे गंगापूर रस्त्यावरील नंदनवन लॉन्सच्या शगुण हॉलमध्ये गणपती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. श्रीया कुलकर्णी आणि स्नेहा वाणी यांनी मुलांना गणपती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेत नाशिक शहरातील सुमारे पाचशे बालकांनी पर्यावरणस्नेही बाप्पा घडविले.

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेला नाशिककरांनी भरघोस प्रतिसाद दिला. नाशिकमधील डॉ. श्रीया कुलकर्णी यांनी केलेल्या सूत्रबध्द मार्गदर्शनामुळे अनेकांनी गणेशमूर्ती निर्मितीचा आनंद अनुभवला. सुमारे चार तास ही कार्यशाळा चालली. उपस्थितांच्या मनातील मूर्ती घडविण्याबाबतची भीती दूर करीत डॉ. श्रीया कुलकर्णी आणि स्नेहा वाणी यांनी मार्गदर्शन केले. गणपतीच्या मूर्तीचा बेस कसा बनवायचा, गाजराचे आकार करुन पाय कसे तयार करायचे, सिलेंडरच्या आकाराने पोट कसे तयार करायचे, पोटाचा आकार कसा द्यायचा, हात कसे बनवायचे, वरच्या मध्यभागी राह‌िलेल्या चौकोनावर सोंडेचा आकार कसा द्यायचा, याबाबत अत्यंत सोप्या पध्दतीने त्यांनी मार्गदर्शन केले.

शाडू मातीमध्ये पाणी किती प्रमाणात मिसळावे, आकार देताना माती किती म‌िळून घ्यावी यासह हात, पाय, कान यांचे विविध आकार कशाप्रकारे तयार करावेत याबाबत त्यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. बाहेर मिळणा‍ऱ्या गणेश मूर्तीप्रमाणेच आकर्षक मूर्ती आपणही बनवू शकतो असा आत्मविश्वास अनेकांच्या चेहऱ्यावर कार्यशाळेनंतर दिसत होता. गणपती तयार करताना तो उजव्या सोंडेचा आहे का डाव्या सोंडेचा हे कसे ओळखायचे, याविषयी मुलांना मार्गदर्शन केले.

अनेकांना आपल्या हातून नेमकी कशी मूर्ती घडेल, याची अनेकांना भीती वाटत होती. त्यामुळे मातीच्या गोळ्यांचे वाटप झाल्यानंतर डॉ. कुलकर्णी यांनी सर्वांना मातीच्या एका गोळ्याचे विविध आकार बनवायले लावले. ‘या मातीला आपण आपल्याला हवा तसा आकार देऊ शकतो व तो आवडला नाही तर पुन्हा बदलू शकतो’, असे त्यांनी सांगितले. यामुळे आपली मूर्ती कशी होईल, याची भीतीच प्रशिक्षणार्थींच्या मनातून नाहीशी झाली. आपण बनवलेल्या मूर्तीत भाव असतात. त्याच्याशी आपण नकळत एकरूप होतो. त्यामुळे आपण बनवलेली मूर्ती श्रेष्ठच असते, असेही त्यांनी बालकांना सांगितले.

विशेष म्हणजे काही रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे नाशिक शहरातील मुलांबरोबरच आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या तब्बल ३०० मुलांना देखील या कार्यशाळेत सहभागी करून घेण्यात आले. यात शासकीय आश्रमशाळा वारे, आंबेगाव, धोंडेगाव, वाघेरे तसेच पुणे विद्यार्थी गृह आणि रचना शाळेच्या मुलांचा समावेश आहे. आश्रम शाळांतील मुलांनीदेखील अतिशय सुबक गणपती बाप्पा साकारले. पैकी काहींनी तर या कार्यशाळेच्या निमित्ताने पहिल्यांदाच नाशिक पाहिल्याचे सांगितले.

या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व बालकांना सहभागाबद्दल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्वांना जहागीरदार बेकरीतर्फे अल्पोपहार देण्यात आला. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष राधेय येवले, सचिव मुग्धा लेले, गौरव सामनेरकर, मृदुला बेळे, उन्मेष देशमुख, ओमप्रकाश रावत, पराग जोशी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*