18 गावे टंचाईग्रस्त

0
नाशिक । दि. 26 प्रतिनिधी – एकीकडे जिल्ह्यातील धरणे भरल्याने धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असतानाही दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील 18 गावांना टंचाईचा सामना करावा लागत आहे.
पूर्व भागात पावसाने पाठ फिरवल्याने परिणामी टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकर सुरू ठेवण्यास मुदतवाढ देण्यात आली आली आहे. त्यासाठी 12 टँकरद्वारे 18 गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. बागलाणमध्ये सर्वाधिक 8 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
आजमितीस जिल्ह्यातील 24 प्रकल्पांत 5289 दलघफू इतका म्हणजेच 81 टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील आठ धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तर इतर धरण समुहात 90 टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा आहे.

धरणे भरल्याने नाशिकमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे जायकवाडी धरण 52 टक्के भरले. यावर्षी उन्हाळ्यात भेडसावणार्‍या पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी फेब्रुवारीपासूनच टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता.

शासनाने प्रारंभी जूनअखेर टँकर सुरू करण्यास अनुमती दिली होती. मात्र जिल्ह्याच्या पूर्व भागातील काही तालुक्यांत पावसाने पाठ फिरवल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

एकीकडे धरणातून विसर्ग सुरू असताना नांदगाव, मालेगाव, बागलाण, देवळा, चांदवड, सिन्नर व येवला या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई अद्याप कायम आहे. परिणामी या टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकर सुरू ठेवण्यास मुदतवाढ देण्यात आली. त्यासाठी 12 टँकर सुरू करण्यात आले असून, सर्वाधिक 8 टँकर हे बागलाण तालुक्यात आहेत. तर सिन्नरला 3 व नांदगावला एका टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

धरणांतून विसर्ग
आज पावसाने विश्रांती घेतली असली तरी गंगापूर धरणातून 520 दलघफू, दारणातून 1100 दलघफू तर पालखेडमधून 5466 दलघफू इतका विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदेचा प्रवाह खळखळला. बागलाण तालुक्यात आतापर्यंत 64 मि.मी पाऊस पडला तर सिन्नरला 92 टक्के पाऊस होवूनही टँकर सुरू करावा लागला. मालेगावमध्ये मात्र अवघा 55 टक्के पर्जन्यमान झाल्याने तालुक्यावर टंचाईचे सावट कायम आहे.

 

LEAVE A REPLY

*