Type to search

शेतीसमृद्ध मानूर आणि प्रगतीच्या वाटेवरील ओतूर व कुंडाणे

दिवाळी विशेष - रिपोर्ताज

शेतीसमृद्ध मानूर आणि प्रगतीच्या वाटेवरील ओतूर व कुंडाणे

Share

नाशिक जिल्ह्यामध्ये विकासप्रक्रिया कशी सुरू आहे? सरकारी योजनांची काय स्थिती आहे. शेतकऱ्यांसह लोकांना या योजनांचा लाभ होतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी महिन्यात आम्ही जिल्ह्यातील अनेक गावांत फिरलो आणि या रिपोर्टरच्या डायरीत त्याची नोंद करत गेलो. त्या डायरीतील हे तिसरे प्रकरण.

नाशिक कळवण रस्त्यावर असणाऱ्या मानूर गावाचा विकास चांगल्या प्रकारे झाला आहे. गावातील शेतकरी दुग्धव्यवसायासह आधुनिक तंत्राची शेती करताना दिसून आले. विशेष म्हणजे कळवण आणि मानूर गाव जवळपास एकत्रच आले आहे. त्यामुळे कळवण शहराचे क्षेत्र वाढलेले दिसून येते.

मानूर हे गाव १०० टक्के हागणदारीमुक्त असून गेल्या वर्षी त्यांना केंद्र सरकारचा ‘स्मार्ट ग्राम’ पुरस्कारदेखील मिळाला आहे. गावात पथदीप, सोलर सिस्टीम, स्वच्छ पाणी अशा सुविधा मानूर ग्रामपंचायतीकडून देण्यात येतात.

नळयोजनेचा प्रभावी वापर करून प्रत्येक घरात नळ पोहोचविण्यात ग्रामपंचायत यशस्वी झाली आहे. गावात राहणाऱ्या अनेक नागरिकांनी वेगवेगळे व्यवसाय कळवण आणि मानूरमध्ये थाटले आहेत. शहराच्या नजीक गाव असल्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांसह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र याठिकाणी आहे. त्यामुळे दरवर्षी शासकीय आयटीआय पूर्ण करून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाता आहे. त्यामुळे आर्थिक प्रगती साधण्यात मानूरकर यशस्वी झाल्याची माहिती येथील ग्रामस्थाने दिली.

तेथून पुढे कळवण शहरातून ओतूरकडे प्रयाण केले. शिरसमणी मार्गे ओतूर येथे पोहोचलो. हा भाग आदिवासी भाग नसला, तरी डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या या गावातील शेतकरी सधन आहे. अनेक शेतकऱ्यांनी अनुदानातून कांदा चाळींची उभारणी केली आहे.  बाजारपेठेचे नियोजन करत शेतातील जास्तीत जास्त कांदा चाळीत भरून ठेवला आहे.  गावात गेलो तेव्हा, म्हणजेच जुनच्या पहिल्या आठवड्यात १ हजार रुपयांपर्यंत कांद्याचा भाव होता.

अनेक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त भाव मिळेल असा विश्वास बोलून दाखविला. त्यामुळे आता खरीपासाठी लागणारे भांडवल गोल्टी (लहान आकाराचा कांदा) विकून त्यांना उपलब्ध होणार आहे. शिवाय मोठ्या आकारातील कांदा चाळीत भरून ठेवला, तो वेगळाच. काही भांडवलदार शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांकडून मार्केटच्या किंमतीत कांदा शेतातून थेट चाळीत भरून ठेवला आहे. पहिल्या पावसानंतर कांद्याचे भाव वाढण्यास सुरुवात होतील, तेव्हा या गावातील शेतकरी मालामाल झालेले असतील.

ओतूर रस्त्याने प्रवास करत असताना पॉलीहाउसमध्ये शेतकऱ्यांनी शिमला मिरचीची केल्याचे दिसते. संजय देवरे अशा शेतकऱ्यांपैकीच एक. गेल्या ५ महिन्यांपासून श्री देवरे यांची शिमला मिरची सुरू आहे. नाशिक, मुंबई किंवा सुरत याठिकाणी त्यांची मिरची विक्रीसाठी जाते. तर लवंगी मिरची आणि टोमॅटोची लागवड मल्चिंग पेपरवर करून अनेक शेतकरयांनी आधुनिकतेची कास धरली आहे.

ओतूरच्या पारावर अनेक ज्येष्ठ मंडळी भेटली. मोदी सरकारच्या ऑनलाईन प्रणालीचे काही जण गुणगाण गात होते तर काही शेतकरी, ‘जेव्हा जातो तेव्हा सर्व्हर डाऊन असतं, काय उपयोग तुमच्या ऑनलाईनचा’ असा समाचारदेखील घेत होते. ‘वीस किमी प्रवास करून तालुक्याच्या गावी जावं आणि काम न होता रिकाम्या हाती परत आलं, तर काय उपयोग’, अशी व्यथाही एकाने बोलून दाखविली.

याठिकाणी शेळ्या, मेंढ्या फार्म्‍ तसेच डोंगराच्या पायथ्याशी शेतकऱ्यांनी मोठमोठे पोल्ट्री फार्म उभारले आहेत. याठिकाणी केवळ अंडी देणाऱ्या कोंबड्यांची एक पोल्ट्रीदेखील आहे. पण डोंगर उताराजवळ असल्यामुळे आणि विजेच्या अनियमिततेमुळे तो सध्या बंद करून ठेवला आहे.

येथील काही शेतकरी डाळिंबाची लागवड करतात. भुरी किंवा मुरमाड प्रकारची येथील जमीन असल्यामुळे डाळींबासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन ओतूर येथील शेतकरी काढतात. अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या उत्पन्नावर शेतात स्लॅबची घरे उभारली आहेत. अत्याधुनिक शेतीकडे वाटचाल केली आहे.

ओतूर झाल्यानंतर मधल्या रस्त्याने थेट कुंडाणे येथील वस्तीशाळा गाठली. वस्तीशाळेतील अंगणवाडीला डिजिटल अंगणवाडी असे नाव दिले आहे. याठिकाणी संगणक नसल्याचे आढळून आले. कुठलीही व्यवस्था नसताना डिजिटल अंगणवाडी कशी असाही प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर काही शेतकऱ्यांशी चर्चा केली. अनेकांनी शेतात तुरीची लागवड केली आहे. हिरवीगार तुरीच्या शेंगांना मागणी असते त्यामुळे शेतकऱ्यांनी तुरीची लागवड केली आहे.

कुंडाणे येथील बहुतांश शेतकऱ्यांची मुले नाशिक, पुणे व मुंबई याठिकाणी उच्चशिक्षण घेत आहेत. अनेक शेतकरी आधुनिक शेती करताना दिसून येतात. डाळिंबाने येथील शेतकऱ्यांना तारलेले दिसून येते. अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या उत्पन्नातून कमावलेल्या पैशांतून आर्थिक प्रगती साधली आहे.

कुंडाणे गावात शेततळे, कांद्याच्या अनुदानित चाळी बघावयास मिळाल्या. त्याबद्दल येथील शेतकरी समाधान व्यक्त करतात. मात्र आता नवीन प्रकरणे केली, तर तिथे सरकारी नोकराला पैसे द्यावे लागतात असाही आरोप येथील शेतकऱ्यांनी केला.

कुंडाणे गाव १०० टक्के हागणदारीमुक्त झाले आहे, विशेष म्हणजे या गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी शेतातदेखील शौचालयांचे बांधकाम करून घेतले आहे. आदिवासी बहुल भाग याठिकाणी नाही, त्यामुळे शासनाच्या उज्ज्वला योजना किंवा इतर आदिवासींच्या कल्याणासाठी आणलेल्या योजनांचा लाभ झालेला नाही.

मात्र कामगारांची वस्ती असणाऱ्या ठिकाणी घरकुल योजना, उज्ज्वला योजनांचा लाभ घेतला आहे. कुंडाणे गावाला चणकापूर धरणाच्या उजव्या कालव्यामुळे पाण्याची कमतरता भासत नाही.  येथील मुख्य पिके द्राक्ष, डाळिंब, तूर, भेंडी, कोबी, फ्लावर, बाजरी, मका, गहू, हरभरा अशी आहेत.

या गावात मुक्काम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कळवण तालुक्यातील निवाणे येथे जाणे झाले. या गावातील शेतकरी सधन आहेत. नोकरदारांची संख्याही या गावात मोठी आहे. अनेक कुटुंब गाव सोडून नोकरीच्या गावी स्थलांतरित झाली आहेत. कळवणपासून अवघ्या ८-१० किमी अंतरावर असलेल्या निवाण्याला दोन्ही बाजूंनी डोंगराने वेढा घातला आहे.

डोंगर उतारावर येथील शेतकऱ्यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू केले आहेत. अनेक शेतकरी रोपवाटिकेत मिरची, टोमटो अशी रोपटे तयार करून शेतकऱ्यांना विक्री करतात. यासाठी ते आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहेत.

येथील प्रगतीशील शेतकऱ्यांशी भेट झाली. यावेळी त्यांनी शासनाच्या योजनांचा बऱ्यापैकी लाभ शेतकऱ्यांनी घेतला असल्याचे सांगितले. गावात नळ योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. संपूर्ण घरात पाणी शुद्ध करून ग्रामपंचायत पोहोचवते. आरोग्य केंद्राची अवस्था जेमतेम असली, तरी प्राथमिक उपचार याठिकाणी होऊन जातात. आपत्कालीन परिस्थितीत कळवण येथील डॉक्टर याठिकाणी भेट देतात असेही सांगण्यात आले.

  • दिनेश सोनवणे, देशदूत डिजिटल
Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!