Type to search

देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार २०१९ : आरोग्य संस्कार रुजवणे गरजेचे – डॉ. राजश्री पाटील

Featured Karmayogini नाशिक

देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार २०१९ : आरोग्य संस्कार रुजवणे गरजेचे – डॉ. राजश्री पाटील

Share

* ईएसआयएसमधून १९९१ पासून मेडिकल ऑफिसर म्हणून करिअरला प्रारंभ.
* आयएमएमध्ये सक्रिय सहभाग. मिशन पिंकचा उपक्रम यशस्वीपणे राबवला.
* नॅशनल वुमन डॉक्टरर्स विंग महाराष्ट्र स्टेट सहसचिवपदी असताना तेजस्विनी प्रोजेक्ट राबवला.
* मुलींमधील ऍनेमिया रोखण्यासाठी ‘मिशन पिंक’ची मुहूर्तमेढ

गेली २९ वर्षे राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णसेवा करत आहे. त्याबरोबरच नॅशनल वुमन डॉक्टरर्स विंग महाराष्ट्र स्टेट सहसचिवपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. नुकतेच तेजस्विनी आणि मिशन पिंक असे महत्त्वाचे प्रकल्प राबवले आहेत.

माझा हा प्रवास सुरू होतो कोल्हापूरमधून. घरात शेती व्यवसाय असला तरी शिक्षणाची सगळ्यांना आवड होती. मला खेळही आवडायचे. मात्र माझी अभ्यासतील आवड बघून वडिलांनी मला डॉक्टर करण्याचे ठरवले.
मुळातच शिकण्याची आवड असल्यामुळे सर्व परीक्षा उत्तीर्ण होत मी एमबीबीएस झाले. शिक्षण सुरू असतानाच लग्न ठरले. ईएसआयएसमधून मेडिकल ऑफिसर म्हणून कामाला सुरुवात केली.
दुसरीकडे संसार सुरू होऊन दोन मुले आणि नोकरी असा प्रवास सुरू झाला. त्यानंतर नऊ वर्षांनंतर जे.जे हॉस्पिटल मुंबई येथून एमडी मेडिसीन पूर्ण केले. नाशिकमध्ये येऊन सन १९९१ मध्ये फिजिशियन म्हणून रुग्णसेवेची सुरुवात अव्याहतपणे सुरू आहे.
खासगी क्षेत्रात काम करण्याचा मोह आवरला आणि सरकारी वैद्यकीय सेवेतच राहिले. पूर्णवेळ ईएसआयएसमध्ये काम सुरू आहे. तिथे काम करणे हीच माझ्यासाठी समाजसेवा आहे.
या ठिकाणी काम करताना आपल्याकडे आरोग्याबाबत प्रचंड उदासीनता आहे. सरकार दरबारी आरोग्यासाठीचेे बजेट अत्यल्प आहे. जवाहरलाल नेहरू यांच्या काळात सुरू करण्यात आलेली ‘ईएसआयएस’ही योजना खूप चांगली आहे.
कालानुरूप त्यात सुधारणेची गरज असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली तर अनेकांसाठी ती वरदान ठरणारी आहे. या ठिकाणी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचा काहीजणांकडून कंटाळा केला जातो. सरकारी दवाखान्यात चांगली सेवा मिळणार नाही असा चुकीचा ग्रह लोकांच्या मनात बनलेला दिसतो. इथे नक्कीच उत्तम रुग्णसेवा दिली जाते.
ईएसआयएसमध्ये काम करत असताना ‘आयएमए’मध्ये सक्रिय सहभाग आहे. ‘मिशन पिंक’ची जबाबदारी माझ्याकडे आहे. याआधी नॅशनल वुमन डॉक्टर्स विंग महाराष्ट्र स्टेट, सहसचिवपदी असताना तेजस्विनी प्रोजेक्ट राबवला होता.
यामध्ये पौगंडावस्थेतील दुर्लक्षित आणि वंचित मुलींची आरोग्य, मासिकपाळी, स्वच्छता, आहार, शारीरिक शिक्षणासोबतच हेमोग्लोबीनची तपासणी केली. या प्रोजेक्टला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प, व्याख्याने, शिबिरे आदींचे आयोजन केले.
यातूनच मग पुढे ‘मिशन पिंक’ची मुहूर्तमेढ रोवली. ऍनेमियाचे निर्मूलन त्यासोबतच याविषयी जनजागृती निर्माण करून महिला आणि मुली यांच्यातील ऍनेमिया रोखणे हा ‘मिशन पिंक’ योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील सुमारे दहा हजार मुलींची तपासणी करण्यात आली आहे.
सुदैवाने नाशिक जिल्ह्यात चिंता करण्यासारखे चित्र नसले तरी सुधारणा कराव्या लागणार आहेत. या कामाबरोबरच मधुमेहाविषयी लोकांमध्ये जनजागृतीचे कामही हाती घेतले आहे. आपल्याकडे लोक खूप आनंदाने मला मधुमेह आहे हे सांगताना दिसतात. याबाबतचे कुठलेच गांभीर्य जनसामान्यांमध्ये नाही.
लवकरच आपला देश मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जाणार आहे. ही बाब गंभीर आहे. लठ्ठपणा मधुमेहाची सुरुवात आहे. वैद्यकीय सल्ला आणि जीवनशैलीत सुधारणा करून मधुमेहावर सहज नियंत्रण ठेवता येते. मुळात लहानपणापासून हे कर, ते करू नको असे सांगितले जाते.
आरोग्याचा कुठलाच संस्कार केला जात नाही. आरोग्याला महत्त्व दिले गेलेले नाही. त्यामुळेच महिलांनी चाळिशी ओलांडल्यानंतर शरीराची नियमितपणे तपासणी करा, शरीराच्या कुठल्याही तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. आपण मुलांना अक्षर ओळख करण्याप्रमाणे कुठल्या दिवसात कसा आहार घ्यावा, काय खावे, अमूक एक खावू नये हे सांगा.
घरात शांतात आणि आनंद कायम ठेवण्यासाठी घराला वेळ द्या. आपल्या इतर जबाबदार्‍या पूर्ण करताना घर ही आपली पहिली जबाबदारी असून आपल्यासोबत घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य जपा, असे मला आवर्जून सांगावेसे वाटते.
Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!