Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

निर्यातबंदीचा फटका; कांदा सहाशे रुपयांनी घसरला

Share

नाशिक । कांद्याचे दर वाढले म्हणून केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंदी जाहीर केली. यामुळे जिल्ह्यात या निर्णयाविरोधात शेतकर्‍यांचा उद्रेक झाला आहे. ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. केंद्राच्या कांदा निर्यातबंदीमुळे दरामध्ये क्विंटलमागे 500 ते 600 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे.

या मोसमामध्ये अतिवृष्टी, महापुरामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. इतर राज्यांमधून येणार्‍या कांद्याची आवकही घटल्यामुळे गावठी कांद्याचे दर गत पंधरा दिवसांपासून वाढले होते. त्यामुळे शेतकर्‍यांंच्या कांद्याला अनेक वर्षांनंतर चांगला दर मिळत होता.

मात्र केंद्र शासनाने शहरी भागातील ग्राहकांचा विचार करून निर्यातबंदी करत दर नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी करण्याबरोबरच व्यापार्‍यांनाही कांदा साठवणुकीबाबत निर्बंध घातले आहेत. याचा परिणाम होऊन कांद्याचे दर जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांवर कोसळल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

दोनशे ट्रक बांगलादेशच्या सीमेवर
कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे उन्हाळ कांद्याचे सुमारे दोनशे ट्रक बांगलादेशच्या सीमेवर अडकून पडले आहेत. केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेण्यापूर्वीच हे ट्रक महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातून बांगलादेशकडे रवाना होण्यासाठी गेले होते. मात्र केंंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेताच सुमारे 200 ट्रक बांगलादेशाच्या सीमेवर अडकून पडले आहेत. यासंदर्भात आपण केंद्र शासनातील संबंधित कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे, असे खासदार डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

केंद्र व राज्य शासनाने संपूर्ण शेतकर्‍यांना कर्जमाफी केलेली नाही. परिणामी आजही शेतकरी कर्ज भरू शकलेले नाहीत. त्यातच आता भाववाढीमुळे दोन पैसे कांदा उत्पादकांना मिळत असताना शासनाने निर्यातबंदी करून शेतकर्‍यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. कांदा निर्यातबंदी तत्काळ उठवावी, अन्यथा शेतकरी तीव्र आंदोलन करतील.
देवीदास पवार, शेतकरी संघटना

केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी करून शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. गतवर्षी कांद्याचे भाव कवडीमोल झाले. त्यावेळेस शेतकर्‍यांची आठवण शासनाला झाली नाही. मातीमोल कांदा विकावा लागल्याने उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली. तेव्हा शासन कुठे होते. शासनाने निर्यातबंदी करून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले आहे.
विजय आव्हाड, कांदा उत्पादक

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!