Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

कळवण/सुरगाणा मतदारसंघ- विधानसभा निवडणूक २०१९ : तिरंगी लढतीत वर्चस्वासाठी सामना

Share

कळवण | किशोर पगार 

व्यक्तिकेंद्रित राजकारणाची किनार असलेल्या कळवण- सुरगाणा मतदारसंघात या खेपेला प्रस्थापितांच्या अस्तित्वाची लढाई बघायला मिळणार आहे. माकपकडून आमदार जे. पी. गावित पुन्हा एकदा विधानसभेत जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्याविरोधात माजी मंत्री कै. ए. टी. पवार यांच्या पराभवाचा बदला घेण्याच्या इर्षेने त्यांचे पुत्र नितीन पवार राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर महायुतीने या दोघांविरोधात भाजपचे मोहन गांगुर्डे यांना उमेदवारी दिली असून खासदार भारती पवार यांनी गांगुर्डे यांच्याविरोधात ताकद उभी केली आहे.

मतदारसंघ पुनर्रचनेत सुरगाणा व कळवण या दोन तालुक्यांचा मिळून असलेल्या कळवणवर लाल बावटा कायम राहणार की पवार कुटुंबाला पुन्हा नेतृत्वाची संधी मिळणार याकडे अवघ्या जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत. खा. पवार यांच्यासाठीदेखील वर्चस्व दाखवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. स्वतंत्र मतदारसंघ असताना सुरगाण्यातून आमदार गावित तर कळवणमधून एटींनी आपली पकड कायम ठेवली होती.

मात्र गेल्या निवडणुकीत हे दोन्ही तालुके जोडले जाऊन अस्तित्वात आलेल्या कळवण मतदारसंघात आमदार गावित यांनी एटींचा पराभव केला. आता त्यांना शह देण्यासाठी नितीन पवार यांनी दंड थोपटले आहेत. मतदारसंघात फिरताना त्यांनी गेल्या पाच वर्षांत मार्गी न लागलेल्या विषयांना हात घातला आहे.

व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा पगडा असलेल्या या मतदारसंघात तिरंगी सामना बघायला मिळणार आहे. कार्यालय स्थलांतर थांबेल, ओतूर धरणाची गळती बंद होईल या गेल्या नवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता अद्याप होऊ शकली नाही. कधी नव्हे इतकी भयावह परिस्थिती मतदारसंघात निर्माण झाली असताना पाण्याचे कुठलेही नियोजन करता आले नाही.

इतिहासात पहिल्यांदा चणकापूर धरण कोरडे पडले. पुनद धरणातून बागलाणला थेट पाईपलाईन जात असल्याचे सांगत पवार यांनी आमदार गावित यांना कोंडीत पकडले आहे, तर जिल्हा परिषदेचा निधी अन्य तालुक्यात वळवण्याचा प्रकार, गोल्डन गँग या विषयांना हात घालत आमदार गावित हेदेखील पवार यांच्याविरोधात टीका करत आहेत. सप्तशृंगी गडावरील स्कायवॉकचे रखडलेले काम मार्गी लागायला हवे.

सुरगाण्यात सिंचन, आरोग्य, वीज, पाण्यासाठी छोटी-मोठी धरणे व्हायला हवीत. कळवणचा कांदा व भाजीपाल्याला योग्य बाजारपेठ निर्माण व्हायला पाहिजे. बायपास रस्त्याची निर्मिती करून कार्यालय स्थलांतरप्रमाणे कळवण शहराची बाजारपेठ नष्ट करून पुन्हा व्यापार्‍यांचा रोष पत्करण्यापेक्षा गावातील शासकीय भूखंडांवर रोजगारनिर्मिती प्रकल्प निर्माण करण्यात यावेत.

खासगी एमआयडीसीत बदल घडवत तिचे शासकीय एमआयडीसीत रूपांतर करताना लघु व मोठ्या उद्योगांना प्रोत्साहित करणे गरजेचे असून तसे झाले तरच बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे व याच मुद्यांना केंद्रस्थानी ठेवून मतदारसंघात तीनही प्रमुख उमेदवारांकडून प्रचाराची राळ उठवली जात आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!