Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या राजकीय

निवडणूक खर्च सादर करण्यास 23 जूनची मुदत

Share

नाशिक । प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर उमेदवारांनी प्रचारासाठी केलेल्या खर्चाचा हिशेब निवडणूक शाखेकडे सादर करण्यासाठी येत्या 23 जूनची अंतिम मुदत दिली आहे. या कालावधीत उमेदवारांना खर्चाची आकडेवारी सादर करणे बंधनकारक आहे. अन्यथा निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाणार आहे.

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झाले होते. तर, 23 मेला मतमोजणी झाली होती. निवडणूक आयोगाने उमेदवारांना प्रचारासाठी 70 लाख रुपयांची मर्यादा दिली होती. उमेदवारांना तीन टप्प्यांमध्ये हा खर्च सादर करायचा होता. नाशिक लोकसभा मतदारसंघात 18 उमेदवार रिंगणात होते. तर, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आठ उमेदवार रिंगणात होते. यापुर्वी या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांनी दोन टप्प्यांतील प्रचारासाठी केलेला खर्च सादर केला होता.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतमोजणीनंतर पुढील 30 दिवसांत उमेदवारांनी प्रचार खर्च सादर करणे बंधनकारक आहे. ही मुदत संपायला अवघे आठ दिवस उरले आहेत. मात्र, दोन्ही मतदारसंघातील एकाही उमेदवाराने अद्याप खर्च सादर केला नाही. मतदानापूर्वी दोन टप्प्यांमध्ये नाशिक व दिंडोरी मतदारसंघातील उमेदवारांनी खर्च सादर केला होता. मात्र, त्यामध्ये तफावत आढळल्याने निवडणूक शाखेने उमेदवारांना खर्चातील तफावतीबाबत नोटिसा देऊन खुलासा मागविला होता.

आता 23 जूनपूर्वी अंतिम खर्च उमेदवारांना सादर करावा लागणार असून त्याची निवडणूक शाखा तपासणी करणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांच्याकडे खर्च सादर करावा लागेल.

मतमोजणीनंतरच्या 30 दिवसापर्यंत उमेदवारांनी प्रचारात केलेला खर्चाचा लेखाजोखा निवडणूक शाखेकडे सादर करणे बंधनकारक आहे. येत्या 23 जूनला ही मुदत संपुष्टात येईल. अद्याप एकाही उमेदवारांचा खर्चाचा तपशील प्राप्त झाला नाहीे.
– अरुण आनदकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!