Type to search

ब्लॉग

जयंती विशेष : प्रत्येक घरातील माणसाच्या नावावर पाच झाडे लावणाऱ्या अहिल्यामाई होळकर

Share

नाशिक : पतीच्या निधनानंतर सती न जाता चोख राज्यकारभार सांभाळून एक आदर्श निर्माण करणाऱ्या राजमाता अहिल्यामाई होळकर यांची आज जयंती. आहिल्यामाईंचा जन्म ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे झाला. पुढे इंदूर संस्थानाचे मल्हारराव होळकरांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पण खंडेराव होळकर हे १७५४ साली एका लढाईत धारातीर्थी पडले. त्यानंतर अहिल्यामाईंनी राज्यकारभार सांभाळला.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याजवळ लोकोत्तर ठरणारे अनेक महान गुण होते. त्या गुणांच्या जोरावर त्यांनी केवळ माळवा प्रांतातीलच नव्हे तर भारतवर्षातील जनतेच्या मनात अमीट ठसा उमटवला. सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, छत्रपती शिवराय यांच्या परंपरेतील लोकराज्याचा वारसा अहिल्यादेवींनी पुढे नेला.

सरदार मल्हारराव होळकर यांनी अहिल्यामाईंना आपली सून करून घेतली आणि अहिल्यामाईनी देखील नंतर मल्हाररावांचा निर्णय सार्थ ठरविला व होळकर घराण्याची कीर्ती सर्वदूर पोहोचविली. बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तृत्वार लोकाभिमुख राजा बनू शकतो, अशी अहिल्यादेवी होळकर यांची धारणा होती. राजाने प्रजासेवा हीच देवपूजा मानवी या उदात्त विचारांनी त्यांनी राज्य केलं. त्यांच्या राज्यकारभात याचे प्रतिबिंब ठायी ठायी दिसते.

सती जाण्यापेक्षा श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या आग्रहावरुन जनहित महत्त्वाचे मानले. अहिल्यादेवी म्हणतात, “सती जाणे कोणत्या शास्त्रात नाही आणि सती गेल्याने कोणताही मोक्ष किंवा पुण्य मिळत नाही. अशा परंपरेची पद्धत बंद केली पाहिजे.” सती प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. अहिल्यादेवींनी आपल्या होळकरशाहीत दत्तक वारसा मंजूर करून लोकांच्या संसारात सुखाची लाट निर्माण केली.

अहिल्यादेवींनी आपल्या राज्यातील लोकांना जाती किंवा धर्माच्या नावाखाली अस्पृश्यता पाळण्यावर बंदी घातली आणि सर्वांना समान शिक्षण देण्यावर भर दिला. महात्मा फुले यांनी आपल्या शाळेचे नाव अहिल्या आश्रम ठेवले, तर राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठीच्या दवाखान्याला अहिल्या स्मरणार्थ दवाखाना असे नाव दिले. अशी ही थोर समाजसुधारक राणी होती.

अहिल्यादेवींनी जंगलतोडीवर कु-हाडबंदी आणली. प्रत्येक घरातील माणसाच्या नावावर पाच झाडे असे गणित देऊन झाडे लावून घेतली. जे झाडे लावत नाहीत त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचा आदेश काढला. आपल्या स्वतःच्या मुलीचा आंतरजातीय विवाह करून स्वतःच्या घरापासून सुधारणेची सुरुवात केली. अहिल्यादेवींनी त्या काळी हुंडाविरोधी कायदा करून हुंडा देणा-या, घेणा-या व मध्यस्थी करणा-यांना दंड ठोठावला. परराज्याशी सलोख्याचे संबंध राहावे म्हणून त्यांनी पंधरा राज्यांत आपले वकील नेमले होते.

इतर राज्यांतील नऊ वकील होळकर राज्याच्या दरबारात होते. मातोश्री अहिल्यादेवींनी निर्माण केलेल्या प्रशासन व्यवस्थेत प्रजेची उन्नती व विकास, सामाजिक शांतता, सुव्यवस्था, समता व ममत्व, न्याय, स्वातंत्र्य या मूलभूत मानवी मूल्यांचा प्रत्यक्ष आस्वाद त्या काळात जनता घेत होती. यापासून आजच्या प्रशासनाला खूप काही शिकण्यासारखे आहे.

इ.स. १७६५ मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाईदरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरुन मल्हाररावांचा अहिल्यादेवींच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसून येते. ‘चंबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा. तेथे तुम्ही ४-५ दिवस मुक्काम करू शकता. तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा… कूच करताना, मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा.’

पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवींनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी, अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता. पण होळकरांचे सैन्य अहिल्यादेवींच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. अहिल्यादेवी सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोप-यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत, असे म्हणतात.

पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होता, त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्यादेवींनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गा-हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी नर्मदा तीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रुपांतर करणे, हे अहिल्यादेवींनी केलेले फार मोठे काम होते.

महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानीही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंत फंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्यादेवींनी आश्रय दिला. कारागिर, मूर्तिकार व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणी पण सुरू केली. कोणत्याही काळात राज्यकर्त्यांना या गुणांपासून प्रेरणा मिळेल हे नक्कीच.

-प्रा. राम शिंदे, जलसंधारण आणि ओबीसी कल्याण मंत्री

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!