Type to search

Breaking News अग्रलेख आवर्जून वाचाच संपादकीय

महिला दिन विशेष : महिला सबलीकरण म्हणजे नेमके काय?

Share
आज 8 मार्च! जागतिक महिला दिवस! या दिवसाला न्यूयॉर्कच्या वस्त्रोद्योगातील महिला कामगारांच्या संघर्षाचा आणि महिलांना मतदानाचा हक्क मिळवून देणार्‍या युरोपमधील लढ्याचा इतिहास आहे. समाजात महिलांच्या प्रश्नांविषयी जागरुकता वाढावी यासाठी हा दिवस साजरा करणे गरजेचे आहे. तथापि केवळ एक दिवस साजरा करून जागरुकता निर्माण होईल का? महिलांच्या कर्तृत्वाचा परीघ विस्तारत आहे.

महिलांनी पादाक्रांत केेले नाही असे एकही क्षेत्र राहिले नसावे किंवा अपवादानेच शिल्लक असावे. तथापि प्रत्येक क्षेत्रात महिलांचे पाऊल जसे पुढे पडत आहे तशतशा यासंबंधातील मर्यादाही स्पष्ट होत आहेत. एकविसाव्या शतकातही महिला सामाजिकदृष्ट्या सुरक्षित नाहीत. त्यांच्यावरील अन्याय आणि अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. शारीरिक अत्याचाराच्या आडून त्यांचा आवाज दाबला जात आहे. मुलीची पालकांना काळजी वाटावी असेच समाजातील वातावरण आहे. महिलांना कायमच अनास्थेला, अवहेलनेला आणि दुय्यमतेला सामोरे जावे लागते.

तथापि या प्रश्नांचा समाजातील सर्व घटकांनी एकत्रित विचार करायला हवा. प्रश्नांच्या मुळापर्यंत जायला हवे; पण तसे न करता महिला आणि पुरुषांत भेद निर्माण केला जात आहे का? सबलीकरण हा बहुआयामी शब्द आहे. महिलांना एक व्यक्ती व माणूस म्हणून विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या अंगभूत क्षमतांची जाणीव त्यांना करून देणे व निर्णय स्वतंत्रपणे घेण्याचे अधिकार देणे म्हणजे सबलीकरण असे ढोबळमानाने म्हणता येईल; पण त्याऐवजी महिलांचे सबलीकरण म्हणजे त्यांची पुरुषांशी स्पर्धा, दोघांमध्ये कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ हे ठरवणे असा चुकीचा मतप्रवाह प्रस्थापित होत आहे की केला जात आहे?

पुरुषांची अवहेलना करणे, त्यांना उणेपणा आणणे आणि महिलांच्या तुलनेत हीन ठरवणे हाच सबलीकरणाचा अर्थ लावला जात आहे का? महिला आणि पुरुषाचे अस्तित्व एकमेकांना पूरक आहे. ते दोघेही समाजाचे अविभाज्य अंग आहेत. संविधानानेही महिला आणि पुरुष समानतेचे तत्त्व मान्य केले आहे. हे दोन घटक एकाच नाण्याच्या दोन बाजू असले तरी समाजाच्या विकास प्रक्रियेत आणि सृष्टीचा तोल सांभाळण्यात या दोन्ही घटकांचे स्वत:चे असे वेगळे महत्त्व आहे. हे लक्षात न घेता महिला आणि पुरुषांत स्पर्धा एवढाच सबलीकरणाचा एकतर्फी अर्थ काढला जाऊ लागला तर त्यातून नवे अनर्थ ओढवतील. हे कधीतरी लक्षात घेतले जाईल का?

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!