बर्फ तपासणीत एफडीए पडली ‘गार’

0

नाशिक | प्रतिनिधी
ऐन मोसमात अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए)अक्षम्य दुर्लक्षामुळे गलिच्छ तसेच रोगराईला कारणीभूत ठरणारा बर्फ नाशिककरांच्या पोटात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. बर्फ तयार करण्यासाठी वापरले जाणारे पाणी जंतुमुक्त, जागा स्वच्छ असणे आवश्यक आहे, मात्र एफडीए निवडणुकीच्या कामात अडकल्याने शहरातल्या बर्फाची तपासणी ‘गार’ पडली आहे. ज्या मोसमात बर्फाचा सर्वाधिक वापर होतो त्याच उन्हाळयात बर्फाच्या दर्जाची तपासणी करण्यासंदर्भात प्रशासन थंडगार पडले आहे.

रसवंतीगृहांपासून, विविध हॉटेल्स, शीतपेयांची दुकाने-हातगाड्या, मंगल कार्यालये आदी ठिकाणी प्रामुख्याने पिण्याच्या थंड पाण्यासाठी बर्फांचा वापर सध्या वाढला आहे. मात्र अर्धा उन्हाळा संपला तरी या बर्फाची तपासणी करण्यास अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) वेळच मिळालेला नाही. उन्हाळ्यात शहरात दररोज शेकडो टन बर्फाची मागणी असते. शहरातील पंचवटी, त्र्यंबकरोड व अन्य परिसरातील बर्फ उत्पादकांकडून बर्फाचा पुरवठा केला जातो. उद्योगासाठी व अन्य कारणासाठीचा अखाद्य बर्फ निळ्या रंगाचा आणि खाण्यासाठी वापरला जाणारा बर्फ रंगहीन असला पाहिजे, असा नियम शासनाने केला आहे. मात्र या सर्वांची काटेकोर तपासणीच सध्या शहरात होत नाही.

लिंबू सरबत, कोकम, कैरी पन्हे, उसाचा रस, ताक, लस्सी यासह सर्व प्रकारच्या शीतपेयांमध्ये तसेच मद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फाचा वापर होतो. दरवर्षीच्या उन्हाळयात एफडीएकडून बर्फाचे नमुने घेवून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. यंदा या तपासणीला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे नाशिककरांच्या पोटात कोणत्या दर्जाचा बर्फ जात आहे, याबद्दलची स्पष्टता मिळालेली नाही.

यापूर्वी नाशिक एफडीएने केवळ गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ पकडून कारवाई केली आहे. मात्र नागरिकांचा दैनदिन संबंध येत असलेल्या बर्फावर कारवाई केली नसल्याचे आढळून येत आहे.

LEAVE A REPLY

*