ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ

ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ

नाशिक | प्रतिनिधी

जिल्ह्यात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सततच्या बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्षांच्या प्रतवारीवर होणार असल्यामुळे उत्पादकांना आर्थिक फटका बसणार आहे.

यावर्षी जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचा द्राक्षांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. महिनाभरापूर्वीच अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ५५ हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांचे नुकसान झाले. या नुकसानीतून द्राक्ष उत्पादक सावरत असताना वाचलेेल्या बागा आता अवकाळीच्या शक्यतेमुळे संकटात सापडतात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात सध्या ढगाळ हवामान असून निफाड व दिंडोरी तालुक्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. अजूनही एक-दोन दिवस ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता आहे. सध्या अनेक द्राक्षबागा फुलोरा व काढणीच्या अवस्थेत आहेत.

बागांमधील द्राक्षांचे मणी तडकू लागले आहेत. तसेच घडांंमध्ये पाणी साचून मणीही खराब होत आहेत. द्राक्षबागांवर मोठ्या प्रमाणात डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. आठवडाभरापूर्वी आलेली थंडी, त्यानंतर ढगाळ हवामान अशा बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्षबागांना बसत आहे

दोन दिवसांपासून शहर व जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण होत असून वातावरणात चढ-उतार होत आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात असे वातावरण निर्माण झाले आहे. ३ डिसेंबरपर्यंत असेच ढगाळ वातावरण राहील. तसेच हलक्या पावसाची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम द्राक्षबागांवर होत आहे.

बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्षबागांना बसत असून अनेक बागांवर डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे द्राक्षांवर औषधे, पावडर फवारणीचा अतिरिक्त बोजा शेतकर्‍यांवर पडत आहे.
– बाळासाहेब क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक

लांबलेला परतीचा पाऊस, त्यानंतर थंडी आणि आता ढगाळ हवामान याचा फटका द्राक्षबागांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. परिणामी निर्यातक्षम द्राक्षांना आता मोठ्या प्रमाणात हानी पोहोचणार आहे.
– सुनील भामरे, द्राक्ष उत्पादक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com