Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या राजकीय

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तीन दिवसांचा ‘ड्राय डे’

Share

नाशिक । प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तीन दिवसांचा ड्राय डे असणार आहे. परंतु जळगाव जिल्ह्यात देशी व विदेशी दारू दुकाने सील करण्यात आली असली तरी तशी कारवाई नाशिक जिल्ह्यात करण्यात येणार नसलयचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणूकीसाठी येत्या सोमवारी (दि.29) मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यावेळी इच्छुक उमेदवार किंवा त्यांच्या समर्थकांकडून मतदारांना मद्याचे आकर्षण देण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यात तीन दिवस ‘ड्राय डे’ घोषीत केला आहे. त्यानुसार शनिवारी (दि.27) सायंकाळी पाच वाजेपासून रविवारी (दि.28) आणि सोमवारी (दि.29) संपूर्ण दिवस जिल्ह्यात ड्राय डे राहणार आहे.

यामुळे कोणत्याही प्रकारचे मद्यविक्री होणार नाही. तसेच अवैधरित्या कोणी मद्यविक्री किंवा मद्यवाहतूक करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथके तैनात करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात तीन ते चार दुकांने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने सील करण्यात आली आहेत. अशा प्रकारे प्रथमच कारवाई झाल्याने याची जोरदार चर्चा नाशकातही होती. परंतु सर्व दुकानदारांना कडक सुचना देण्यात आल्या असून त्याचे पालन केले जाईल याकडे उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष आहे. यामुळे जिल्ह्यात दुकाने सील करण्याची कारवाई केली जाणार नसल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपआयुक्त प्रकाश सुर्वे यांनी स्पष्ट केले आहे.

उमेदवारांचा जाहीर प्रचार 27 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता संपुष्टात येणार आहे. त्यादृष्टीने दारुविक्रीची दुकानेही बंद केली जाणार आहेत. 28 व 29 एप्रिल रोजी ही दुकाने बंद राहतील. परंतु जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्या अधिकारात 29 एप्रिलच्या रात्रीही ड्रायडे घोषीत केला आहे. यामुळे अडीच दिवस तळीरामांची गैरसोय होणार आहे. मतमोजणीच्या दिवशीही दुपारपर्यंत जरी निकाल जाहीर होणार असले तरी त्या दिवशी संपूर्ण दिवसभर मद्यविक्री बंद ठेवण्याबरोबरच मतमोजणी संपल्यानंतर पुढील बारा तासांपर्यंत बंदी कायम राहणार आहे.

त्यामुळे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवाराच्या आनंदात तसेच हरलेल्या उमेदवाराच्या दु:खातही तळीरामांना सहभागी होता येणार नाही. दरम्यान अनेकांनी या दोन दिवसांसाठी स्टॉक करण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु कोणाकडे परवानगीशिवाय जादा मद्यचा साठा आढळल्यास कारवाई करण्याची तंबी उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

जळगावात … म्हणून सील
जळगाव जिल्ह्यात दारू दुकाने सील केल्याची मोठी चर्चा सर्वत्र रंगली आहे. परंतु दुकाने सील करावीत म्हणून चक्क दुकानदारांनीच राज्य उत्पादन शुल्कच्या विभाच्या अधिकार्‍यांना विनंती केली आहे. ड्राय डे असतानाही अनेकांकडून येणारा दबाव व धमक्यांच्या पार्श्वभूमीवर अखेर ही मद्याची दुकाने सील करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगीतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!