Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

हत्तीरोगाचे विभागात 272 तर जिल्ह्यात 88 रुग्ण

Share

नाशिक । अजित देसाई
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत झालेल्या सर्वेक्षणात ऑगस्टअखेर नाशिक विभागात हत्तीरोगाचे 272 रुग्ण आढळून आले आहेत. शारीरिक विकलांगता येणार्‍या या आजाराच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत असून गेल्या वर्षी याच आजाराचे 298 रुग्ण विभागात आढळून आले होते. तर नाशिक जिल्हयात या वर्षी 88 तर गेल्या वर्षी 101 रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले आहे.

क्युलेक्स या डासाच्या मादीपासून हत्तीरोगाचा प्रसार होत असतो. निरोगी व्यक्तीला डासाची ही मादी चावल्यानंतर साधारणपणेपाच वर्षांनी या रोगाचे दुष्परिणाम दिसून येतात. हत्तीरोगाच्या निदानासाठी रात्रीच्या वेळी रक्तनमुना चाचणी घेणे आवश्यक ठरते. कारण या आजाराचे जंतू दिवसभर रुग्णाच्या हृदय आणिफुफ्फुसात वास्तव्य करतात व रात्री विश्रांतीच्यावेळी रक्तासोबत शरीरात प्रवाहीत होतात. त्यामुळे सायंकाळी 6 ते मध्यरात्री 12 वाजेदरम्यान या आजाराच्या निदानासाठी रक्त नमुने घेतले जातात. मानवी शरीरात या जंतूंचे जीवनचक्र सहा ते सात वर्षे किंवा त्याहून अधिक काळही चालते.

त्यांची रक्तातील वाढ औषधोपचाराने समाप्त करतायेते. तपासणी केलेल्या रक्ताचा नमुना हत्तीरोगाच्या जंतूंसाठी दूषित आढळल्यास रोगनियंत्रण पथकामार्फत रुग्णाच्या वयोगटानुसार डी.ई.सी.गोळ्यांची मात्रा देण्यात येते.विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हत्तीरोगाच्या नियंत्रणासाठी विशेष कक्ष कार्यरत असून विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये या कक्षामार्फत सर्वेक्षण करून रुग्णांवर उपचार करण्यात येतात. या कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार हत्तीरोग व अंडकोश वृद्धी याआजारांचे अनुक्रमे 272 व 36 रुग्ण नाशिक विभागात ऑगस्ट अखेर आढळून आले आहेत.

तर गेल्या वर्षी हीचसंख्या अनुक्रमे 298 व 100 इतकी होती. नाशिकचा विचार करता जिल्ह्यात हत्तीरोगाचे गेल्या वर्षी 101 रुग्ण होते तर यंदा त्यात घट बघायला मिळाली आहे. ऑगस्ट अखेर जिल्यात 88 रुग्ण असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. तर अंडकोश वृद्धीच्या आजारात दोन्ही वर्षांत प्रत्येकी एक रुग्ण असल्याचे सांगण्यात आले आहे.जिल्हानिहाय उपलब्ध आकडेवारीनुसर यंदा धुळे-30, नंदुरबार-27, जळगाव-88, अहमदनगर 39 याप्रमाणे हत्तीरोगाचे रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर उपचार करून आजार नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

आजाराची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय
शरीराच्या सांध्यांमध्ये, जांघेत, काखेत लहानमोठी गाठ येणे, 102 ते 105 अंशांपर्यंत ताप येणे व कधीकधी थंडी वजने, हातापायांवर सूज येणे, पुरुषांमध्ये अंडकोश वृद्धी व महिलांमध्ये स्तन व जननेंद्रियास सूज येणे, बराच कालावधी गेल्यावर हि सूज टणक होते व कधीही ओसरत नाही. त्यातून कायमची विद्रुपता व अपंगत्व येते.उदा. हत्तीच्या पायासारखा पाय होतो. क्युलेक्स डासाची उत्पत्ती सांडपाणी, गटारी, सेप्टिक टँक, नाल्यांमध्ये होते. सांडपाणी एका जागी साठू न देता घर व परिसरातील पाण्याच्या टाक्या, पिंप, हौद आठवड्यातून एक दिवस कोरडे करावेत. सेप्टिक टँकची झाकणे नीट बसवून व्हेंट पाईपच्या तोंडाला बारीक जाळी बसवावी.

सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे
राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सध्या नांदगाव तालुक्यात सर्वेक्षण करण्यात येत आहे. हिसवळ, न्यायडोंगरी, पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कक्षेत यासाठी पथके कार्यरत आहेत. आजाराचे निदान करण्यासाठी सायंकाळी 6 ते रात्री 12 या वेळेत रक्तनमुने घेतले जात आहे. त्यामुळे अपरात्री दरवाजा ठोठावणार्‍या आरोग्य विभागाच्या सेवकांना सहकार्य करावे, रक्तनमुने तपासून घ्यावेत असे आवाहन विभागीय हत्तीरोग अधिकारी डॉ.आर.आर. त्र्यंबके यांनी केले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!