Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

निवडणुकीच्या कारणावरून महिलेस जबर मारहाण ; आठ जणांवर गुन्हा दाखल

Share

बेलगाव कुऱ्हे । वार्ताहर : ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न केल्याच्या कारणावरून निनावी ( ता. इगतपुरी ) येथील ८ जणांनी महिलेला मारहाण केली. यावेळी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरीला गेल्याचे समजते आहे. ह्या घटनेत महिला गंभीर जखमी झाल्यामुळे तिच्यावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान वाडीवऱ्हे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील निनावी येथील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच झाली. २४ जूनला मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजता वंदना संपत टोचे (४२) ही महिला शेतीच्या कामावरून येत असतांना यमुनाबाई चंद्रभान टोचे, कल्पना भाऊसाहेब टोचे, गणेश उर्फ लहाणू चंद्रभान टोचे, नथू चंद्रभान टोचे, भाऊसाहेब शांताराम टोचे, गुलाब रामनाथ टोचे, रोहिदास रामनाथ टोचे, शिवाजी निवृत्ती टोचे या ८ जणांनी फिर्यादी वंदना संपत टोचे हिला शिवीगाळ केली.

यावेळी आम्हाला निवडणुकीत मतदान का केले नाही अशी विचारणा करून तुम्हाला पाहून घेतो असे म्हणाले. ह्यातील गणेश उर्फ लहानू चंद्रभान टोचे यांनी वंदना टोचे यास ओढत नेले. बाहेर आणल्यावर सर्वांनी तिला बेदम मारहाण केली. ग्रामस्थांनी मध्यस्थी करीत असताना देखील संशयितांनी मारहाण सुरूच ठेवली होती. यावेळी जखमी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरीला गेली.

गंभीर जखमी झालेली वंदना संपत टोचे हिने वाडीवऱ्हे पोलीस ठाणे गाठून संशयितांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. जखमी वंदना टोचे हिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. वाडीवऱ्हे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!