Type to search

नाशिक

इगतपुरीला लाभलेलं सौंदर्याचं कोंदण

Share

इगतपुरी । इगतपुरी हे शहर नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचे केंद्र असल्याने थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे. तालुक्यात भातशेतीचा दरवळ, आल्हाददायक हवा, निर्मळ परिसर, हिरवेगार निसर्गरम्य वातावरण यात हे शहर हरविल्याचे पहायला मिळते. त्यामुळे कोणत्याही मोसमात इगतपुरीत आता पर्यटकांना आपल्या मोहात पाडताना अन् आपल्या ठायी असलेल्या सौंदर्याची यथेच्छ उधळण करताना दिसते. पावसाळ्यात व थंडीत या भागात धुक्याची दुलई, डोंगरांवर पसरलेल्या धबधब्यांच्या रांगा, गडकोटांनी बहरलेला हा परिसर प्रत्येकाला मोहात पाडतो.

त्याच प्रमाणे इगतपुरी तालुक्याचा स्वर्ग समजला जाणारा भावली धरण परिसर…निसर्गराजाने नेत्रात साठवता येणार नाही एवढी भरभरुन दिलेली वनराई…मंद मंद धुंद करणारा पाऊस…क्षणात पालटणारे धुकेमय वातावरण…घनदाट वृक्षांची छाया…मुक्तहस्ते निर्मित धबधबे…खोल खोल दऱ्या…हंबरत हंबरत मंजुळपणे चरणारी गायी गुरे…किलबिलाट करणारे पक्ष्यांचे थवे…रानफुलांचा मंद मंद सुगंध…शेकडो पर्यटकांचे असे अनेकानेक अंगांनी नटुन थटुन स्वागत करणारा भावली धरण परिसर.

 

देशासह विदेशातुन आत्मशांती मिळवण्यासाठी येथे पर्यटक येत असल्याने या विश्व विद्यापीठ विपश्यना केंद्राने इगतपुरीला आंतरराष्ट्रीय नकाशावर स्थान मिळवून दिले. आचार्य सत्यनारायण गोयंका महाराजांनी १९७६ मध्ये इगतपुरीतील वरच्या पेठेच्या मागील टेकडावर विपश्यना विश्वविद्यापीठाची स्थापना केली.

 

 

विपश्यना केंद्र म्हणजेच धम्मगिरीत प्रवेश करण्यासाठी सुंदर अशा म्यानमारगेटमधून आत गेल्यावर सुंदर बगीचा, नक्षीने सजलेले पॅगोडा अन् विपश्यनेच्या विश्वात घेऊन जाणारे वातावरण आपल्याला मंत्रमुग्ध करते. ध्यानगृहाच्या वर सोनेरी रंगाचा चकाकणारा कळस मनोवेधक आहे. आत साधकांना विपश्‍यना साधना समजावून सांगण्यासाठी १०० बाय ६० फूट आकाराचे भव्य सभागृहात आपले तन, मन ध्यानात विलिन होते. कळसाच्या चारही बाजूला ध्यानगृह आहेत. ५० देशात साधारण १०० हून अधिक शाखा या केंद्राच्या आहेत.

यामुळेच देशविदेशातील लोकांची इगतपुरीतील विपश्यनेसाठी नेहमीच रेलचेल असते. हा परिसर अन् धम्मगिरीच्या मागील म्हाळुंगा डोंगर आवर्जून पहावा, असा आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या इगतपुरीत औषधी वनस्पतींचे भांडार असल्याचे ग्रामस्थ सांगतात. यामुळे या भूमिला तपोभूमी म्हटले जाते.

इगतपुरीच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी रेल्वे हा तिचा अती महत्त्वाचा पैलू आहे. कारण रेल्वे आल्यामुळे इगतपुरीची भरभराट झाली. मुंबई-भुसावळ या मार्गासाठी ऑक्टोबर १८५७ मध्ये इंडियन पेनिसुलर व जीआयपी रेल्वे कंपनीने रेल्वे मार्गाच्या कामाला सुरूवात केली. २८ जानेवारी १८६१ मध्ये इगतपुरी-नाशिक हा मार्ग पूर्ण झाला अन् इगतपुरीच्या भरभराटीस सुरूवात झाली. आज इगतपुरी ते कसारा घाटातील रेल्वेचे बोगदे व दोन डोंगराला जोडणारा रेल्वे पुल पाहण्यासाठी येते पर्यटकांचा ओघ पहावयास मिळतो.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!