मुस्लिम मुलीच्या हातून दही हंडी फोडत दिला समतेचा संदेश

0
इगतपुरी | आडवाटेवर दुर्लक्षित असलेल्या आडगड किल्ल्यावर घोटीतील कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी दहीहंडी साजरी केली. सामाजिक सलोखा जपण्यासाठी मुस्लीम कन्या नगमा रफीक खलिफा ह्या चिमुकलीच्या हाताने दही हंडी फोडुन आगळा वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला.
कळसुबाई रांगेचा पूर्वेचा रक्षक किल्ले आडगडाची समुद्र सपाटी पासून उंची ३६६० आहे. खुप साऱ्या पाण्याच्या टाक्या, कोरीव पायऱ्या, गुहेतील आड आईचे मंदिर, अज्ञात वीरांच्या समाधी, दरवाजाचे भग्न अवशेष असा खूप सारा ऐवज आडचा किल्ला बाळगून आहे. इगतपुरी परिसरातुन जाणाऱ्या सह्याद्रीच्या उत्तर-दक्षिण रांगेत कसारा घाटातून सह्याद्रीचा एक फाटा पूर्वेकडे पसरलेला आहे. याच रांगेत महाराष्ट्राचे एव्हरेस्ट, म्हणजे कळसूबाई शिखर वसलेले आहे. त्यावरूनच या रांगेला कळसुबाई रांग म्हणून ओळखले जाते. ही रांग किर्डा शिखरापर्यंत पूर्वेला जाते.
पुढे ती कळसुबाई शिखर, किल्ले बितनगड, पट्टा, औढा, यांना कवेत घेत ईशान्येला वळते. पुढे पूर्वेकडे वळुन किल्ले आडगडला आपल्या कवेत घेत संपते. १६७१ मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पट्टा आणि ओंढागडाबरोबर स्वराज्यात सामील केला. १६७९ मध्ये दक्षिण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात जालनाच्या लुटी नंतर छत्रपती शिवाजी महाराज काही काळ पट्टागडावर विश्रांती साठी आले होते. त्याच वेळी त्यांनी आडगडासही भेट दिली असावी असे काही इतिहास अभ्यासकांचे मत आहे.
आज घोटीतील कळसुबाई मित्र मंडळाने आडगड  किल्ल्यावर दहीहंडी साजरी केली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, प्रशांत येवलेकर, अशोक हेमके, संदेश साळुंखे, प्रशांत जाधव, बाळु आरोटे, संतोष म्हसने, गोकूळ चव्हाण, निलेश पवार, बालाजी तुंबारे, गजानन चव्हाण, प्रवीण भटाटे, गोविंद चव्हाण, सोमनाथ भोर, संदीप खैरनार, सुरेश चव्हाण, नितीन भागवत, सोमनाथ लहाने, चि.यज्ञेश भटाटे, नगमा खलिफा व इतर गिर्यारोहक सामील झाले होते.

LEAVE A REPLY

*