Type to search

नाशिक

रिक्षाचालकांनी श्रमदानातून खड्डे बुजवून केला बैलपोळा साजरा

Share

इगतपुरी । इगतपुरी शहराला जोडणाऱ्या जुन्या महामार्गाची पावसाळ्यात प्रचंड खड्डे पडून चाळण झालेली असल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याचा सर्वाधिक फटका रिक्षाचालकांना बसत असल्याने या रस्त्यावरील खड्डे श्रमदानातून बुजविण्याचा निर्धार केला. यानुसार आज बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर गांधीगिरी करीत रस्त्यावरील खड्डे श्रमदानाने बुजविले.

याबाबत वृत्त असे की, तालुक्याचे ठिकाण असलेल्या इगतपुरी शहराच्या प्रवेशद्वारी बोरटेम्भे ते पंचायत समिती पर्यंतच्या दोन किलोमीटर अंतरावर पावसामुळे प्रचंड खड्डे पडले आहेत. या खड्ड्याच्या फटका वाहनचालकांना बसत असून सर्वाधिक त्रास रिक्षाचालकांना बसत आहे. या खड्ड्यामुळे रिक्षाचे सर्वात जास्त नुकसान होत असल्याने रिक्षा व्यवसाय धोक्यात आला आहे.

या रस्त्याची किमान दुरुस्ती करावी अथवा खड्डे बुजवावे अशी मागणी अनेकदा करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल न घेतल्याने अखेर हे खड्डे श्रमदानातून बुजविण्याचा निर्णय इगतपुरी घोटीतील रिक्षाचालकांनी घेतला. यानुसार खड्डे बुजविण्यासाठी शेतकऱ्याचा पवित्र सण बैलपोळ्याचा सण निवडण्यात आला.

यानुसार आज सकाळी श्रमिक सेना, रिक्षा चालक मालक संघटना आदीसह शेकडो रिक्षाचालकांनी बोरटेम्भे ते पंचायत समिती पर्यंतचा रस्त्यावरील खड्डे श्रमदानातून बुजविले. रिक्षाचालकांच्या या उपक्रमाचे वाहनचालकांनी कौतुक केले आहे.

इगतपुरी शहराला जोडणारा हा मुख्य रस्ता पहिल्याच पावसात खड्डेमय झाला होता.पावसाने विश्रांती घेतल्यानंतर या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यवाही करेल असे अभिप्रेत असताना मात्र संबधित विभागाने लक्ष दिले नाही अखेर रिक्षाचालकांनी बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यावरील खड्डे बुजवून शासनाला चपराक दिली आहे.
– संपत डावखर, नगरसेवक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!