Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

नांदूरवैद्यच्या शेतकऱ्याने केला नैसर्गिक पध्दतीने बहुस्तरीय विषमुक्त शेतीचा प्रयोग

Share

बेलगाव कुऱ्हे|लक्ष्मण सोनवणे :

पर्यावरणाचा होत असलेला असमतोल, शेतीत खते वापरताना आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेऊन रासायनिक खतांना कायमचाच फाटा देत नैसर्गिक विषमुक्त शेतीतून झिरो बजेटमध्ये कोबी, प्लॉवर, कांदे ही तिहेरी आंतरशेती करण्याची कमाल इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील राधारमन दवते यांनी आपल्या शिक्षणाचा व कौशल्याचा वापर करीत केले आहे.

 

तालुक्यातील बहुतांश शेतकरी रासायनिक शेती पद्धतीचा अवलंब करीत असताना या शेतकऱ्याने साधारण एक एकर क्षेत्रात केलेली कोबी फ्लॉवर कांदा यांची नैसर्गिक पध्दतीची बहुस्तरीय विषमुक्त शेती लाभदायक ठरली आहे. याचप्रमाणे दुसऱ्या क्षेत्रातील पाच एकरपैकी साडेतीन एकरात त्यांनी चार वर्षापुर्वी लावलेल्या चिंच लागवडीत आवळा, सीताफळ, कडिपत्ता, शेवगा, तूर आंतर लागवड बहुवार्षिक पीकपद्धतीचे उत्कृष्ट मॉडेल आहे . या फळझाडांच्या ओळींच्या मधील ८ फूट पट्ट्यात लावलेला केवळ ४० किलो खपली गव्हाचे बियाणे त्यांना २५ पोती ( २५०० किलो ) देवून गेले . ही सारी विषमुक्त पद्धतीने राबवलेल्या शेतीची कमाल आहे.

या पीक पद्धतीचा अवलंब केल्यामुळे टप्प्याटप्प्याने उत्पादन व उत्पन्न मिळते. एका पिकातून नुकसान झाले तर दुसऱ्या पिकातून भरून निघते. कोबी, प्लॉवर हे वरंब्यावर लावत वरंब्याच्या बगलेत कांदे लावलेे . या एकाच शेतीतून लावलेल्या पीकात रोगनिवारणासाठी चवळी, झेंडू लावल्याने मावा रोगाचाही प्रादुर्भाव आढळला नाही.

आधी सेंद्रिय पद्धतीने चाललेली शेतीपद्धत, सुभाष पाळेकर गुरुजींच्या शिबिरानंतर शेती नैसर्गिक पद्धतीने होणाऱ्या विषमुक्त शेतीच्या मार्गावर आल्याचे त्यांनी सांगितले. या विषमुक्त शेतीमुळे पिकांवरील रोग कमी होत अधिक सशक्त झाली. विषमुक्त शेतीमुळे उत्पादन भरपूर होवू लागले आहे. अगदी आजूबाजूच्या रासायनिक खते औषधांचा वापर होणाऱ्या उत्पादनाइतकाच तर कधी त्यापेक्षा अधिक वाढलेला दिसतो. जीवामृत, घनजीवामृत, सप्तधान्यांकुरअमृत आदी नैसर्गिक औषधानी शेतीला पोषक तत्व मिळतात. तर दशपर्णी अर्काची फवारणी बहुतेक सर्व किड रोग निवारणासाठी उपयुक्त ठरते आहे.

राधारमण दवते यांनी सेंद्रिय कृषीभूषण राजेंद्र भट यांच्याकडे सेंद्रिय शेतीचे व मुंबई विद्यापीठातून बागकामाचे रितसर शिक्षण घेवून शेतीची सुरुवात केली त्याचवेळी त्यांची पत्नी सुनिताने मध्य प्रदेश, भोपाळ येथील केंद्र सरकारच्या संशोधन व प्रक्रिया केंद्रात जावून शेतीविषयक अभ्यास केला. इथे पिकणाऱ्या सोयाबीनवर प्रक्रिया करून डाळ, दूध व पनीर निर्मिती करून विक्री देखील ते करतात. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या एमएसएमई
मधून भाज्या व फळांच्या प्रकियेचे शिक्षणाची जोडही मिळते आहे .

मुंबईत व्यवसायात उत्तम जम बसून प्रगतीपथावर असताना नैसर्गिक शेती करण्याचा निर्णय घेतला असल्याचे दवते यांनी देशदूत प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. दवते यांनी शेतीचे माती परिक्षण करून अस्तित्वातील जुनी झाडे व त्याव्यतिरिक्त इतर महत्वाची झाडांची जागा निश्छित करून व त्यायोगे इतर झाडे लागवडीचे व पिकरचनेचे प्लानिंग केले.

भविष्यातील पाण्याची कमतरता लक्षात घेवून पीक रचना केली. सेंद्रिय पद्धतीने शेतीची सुरुवात करत पहिल्या वर्षी सोयाबीनचे पिक घेतले व जमीन समृद्ध केली. त्यानंतर सोयाबीन, गहू, हरभरा, भूईमुग अशी पिके दोन वर्षे घेतली. त्याचे अवशेष जमीनीत गाडून जमीनीचा पोत सुधरवल्याचे दिसते. त्यानंतर बटाटा , आले अशी हाताळणीस सोपी व टिकावू पिके त्यांनी घेतली आहे.

या अगोदर सेंद्रिय शेती करताना गांडूळ खताचे सहा बेड वापरत होते. परंतु आता पाळेकरांचे जीवामृत त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या सेंद्रिय संशोधन संस्थेकडून संशोधित केलेले आज गाय पाळू न शकणाऱ्या शेतकऱ्यांना वरदान ठरणारे ‘ वेस्ट डी कंपोजर ‘ हे पण या फायदेशीर पद्धतीचे गुपित आहे . उंच वाढलेल्या नाऱळाच्या झाडांबरोबर आंबा, जांभूळ, कडुलिंब, फणस, भोकर, वड, चिंच, सुबाभूळ, निरगुडी, एरंड इ झाडां मधे पेरू, चिकु, सिताफळ, केळी, हादगा, बहुवार्षिक तूर इ ची भर टाकली. तूळस, पुदिना, गवती चहा, वाळा या बरोबरच गुलाब, जास्वंद, मोगरा, मधुमालती, सोनचाफा, पांढरा चाफा, पारिजात, अशी फुलझाडे लावलेली आहेत. पक्ष्यांसाठी दोन ठिकाणी पाण्याची कुंड ठेवली त्यामुळे पक्ष्यांबरोबर मधमाश्यांची संख्या खूप वाढली आहे.

 

वडिलांच्या कृपेने मला शेतीचे बाळकडू लहानपणीच मिळाले होते. शहरात घेतलेल्या रिकाम्या प्लॉटवर भाताची रोपं आणून लावणी व सोंगणी करेपर्यंत आणि भाजीपाला पिकवत बाजारात विकेपर्यंत साऱ्या कामांचा आनंद आम्ही भावंडांनी घेतला. नांदूर वैद्यसारख्या खेड्यातून पोटापाण्यासाठी स्थलांतर झाले होते. बालपणापासूनच निसर्ग, शेती विषयाची आवड निर्माण करणारे माझे वडील पहिले गुरु आहेत.

नांदूर फूडस ‘या नावाखाली विषमुक्त शेत उत्पादनांची विक्री करतो आहोत व ‘फार्मफूड’ या नावाने येथील फळे, भाज्या, यापासून आरोग्यदायी ज्यूसेस व खाद्यपदार्थ देणारे केंद्र डोंबिवलीत मध्यवर्ती ठिकाणी उभारले आहे .

-राधारमण दवते, शेतकरी नांदूरवैद्य

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!