पत्नीच्या सहकार्यानेच व्यवसायवृद्धी झाली – संजय अमृतकर

0
उमेदीच्या काळात बँकेत नोकरीला असताना यातच करियर करायचे असे ठरवले होते. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. मूळातच फोटोग्राफी, दुर्ग ट्रेकिंग व भटकंतीची आवड असल्याने सभोवतालचे निसर्गसौंदर्य आणि महाराष्ट्रातले गड किल्ले मनाला आतून खुणावत होते.

सन 1987 मध्ये अलका हिच्याशी विवाह बंधनात जोडला गेल्यानंतर खर्‍या अर्थाने माझ्या छंदांना प्रोत्साहन मिळाले. आजपावेतो ट्रेकिंगच्या माध्यमातून सह्याद्रीचे 80 टक्केपर्यंत गडकिल्ले बघितले ते पत्नीच्या सहकार्यानेच!
पुढे फोओग्राफीच्या छंदाचे व्यवसायात रूपांतर केल्यावर बँकेतील नोकरीचा राजीनामा दिला.

जीवनसाथी
कूपन स्पर्धा

नाशिकमध्ये फोटोलॅब टाकताना भागीदार म्हणून अलकाची लाभलेली साथ मोलाची ठरली. तंत्रज्ञानाची प्रगती व फोटोग्राफीत झालेल्या क्रांतीनंतर मात्र या व्यवसायाला उतरती कळा लागली. अशाही परिस्थितीत व्यवसायात तग धरून ठेवताना नाशिकरोडमधील लॅब अलका स्वकर्तृत्वावर यशस्वीपणे सांभाळत आहे.

परिस्थितीपेक्षा आपण प्रबळ बनणे, हाच परिस्थितीवर विजय मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग असतो. आपल्यातील दृढ निश्चयापुढे डोंगराएवढी संकटेसुद्धा पायाशी लोळण घेतात, हे मी अलकाच्या रूपाने अनुभवतोय. कोणत्याही गोष्टीला कौटुंबिक सहकार्याशिवाय पुर्णत्व येत नाही.

आज व्यवसायाला हातभार लावताना पत्नीने कौटुंबिक जबाबदारी लिलया पेलली आहे. आई-वडिलांची मने जिंकत मुलांना संस्कारक्षम बनविण्यात तिचा मोठा वाटा आहे. मूळातच तिला कविता लिखाणाची आवड असल्याने माझ्या भटकंतीच्या छंदातून अनुभवाची शिदोरी लिखाणात मांडतानासुद्धा पत्नीचे मार्गदर्शन मोलाचे ठरते.

ट्रेकिंगमुळे माणूस स्वावलंबी, धैर्यशील, व्यवहारकुशल व क्रियाशील बनतो, हे ऐकून होतो. माझ्यात ही समृद्धता आली ती पत्नीमुळेच. कर्तव्यदक्ष, सुस्वभावी, आनंदी आणि माझे छंद जोपासण्यात पत्नी म्हणून अलका चोख भूमिका बजावत आहे. अशी पत्नी लाभण्यास खरंच भाग्य लागते! माझ्या पुण्यसंचयाने ते भाग्य मला लाभले.

– शब्दांकन : संजय लोळगे

LEAVE A REPLY

*