Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

कॉमर्सचे शेकडो विद्यार्थी एका विषयात ‘नापास’; पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार

Share

नाशिक । प्रतिनिधी
वाणिज्य (कॉमर्स) शाखेच्या तिसर्‍या वर्षात शिक्षण घेणार्‍या शेकडो विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठाने एका विषयात नापास केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान, पुणे विद्यापीठाने या प्रकाराची गंभीर दखल घेत नापास विद्यार्थ्यांचे पेपर फेरतपासणीसाठी घेतले आहेत.

शहरातील बीवायके, केटीएचएम, एम. एस. गोसावी कॉलेज यासह पूणे जिल्ह्यातील महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या तिसर्‍या वर्षात शिक्षण घेणार्‍या शेकडो विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या या भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे. ‘बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क’ या एकाच विषयात विद्यार्थ्यांना नापास करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून दि. 7 जून रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संकेतस्थळावर हा निकाल जाहीर केला होता.

विद्यापीठाने लावलेल्या निकालात ‘बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क’ हा विषय वगळता सर्वच विषयांमध्ये आमची कामगिरी सरस होती. त्यामुळे पेपर लिहूनसुद्धा वरील एका विषयात नापास करण्यात आले आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे आमची मागील गुणवत्ता बघता विद्यापीठाचा हा अन्यायच आहे, असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

या विषयाबाबत बीवायके महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधींनी प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांना निवेदन दिले असून, महाविद्यालयाने यासंदर्भात विद्यापीठाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

 

रिव्हॅल्युएशन नको…
विद्यापीठाने रिव्हॅल्युएशनपेक्षा वेगळी प्रक्रिया राबवावी, जेणे करून वर्ष वाया जाणार नाही. रिचेकिंग आणि रिव्हॅल्युएशन ही वेळखाऊ प्रक्रिया आहे, असे मत विद्यार्थी मृणाल पाटील, तन्वी पूर्णपात्रे व श्रेया भंडारी यांनी व्यक्त केले.

रिचेकिंगचा तीन दिवसात निकाल
पुणे विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांच्या सह्यांचे पत्र मेल करण्यात आले आहे. पेपर फेरतपासणीसाठी टाकण्यात आले असून दोन ते तीन दिवसात त्याचा निकाल लागेल. हा प्रकार कसा घडला याबाबतही माहिती घेतली जात आहे. पेपर तपासणी किंवा सॉफ्टवेअरमध्ये अडथळा आला का? यावरून निश्चित कारण कळू शकेल.

विजय सोनवणे, सिनेट सदस्य पुणे विद्यापीठ.

या विषयाचा निकाल 48 टक्के लागला आहे. बीवायके महाविद्यालयाच्या प्राचार्यांना निवेदन देण्यात आले असून शहरातील तीन महाविद्यालयातील मिळून जवळपास 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यी नापास झाले आहे. विद्यापीठाने यावर तत्काळ कारवाई करून विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा.

कमलेश काळे, विद्यार्थी प्रतिनिधी, बीवायके कॉलेज

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!