Breaking : डॉक्टरच्या हलगर्जीपणाने घेतला बालिकेचा जीव

0
चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार
चांदवड : कायमच या ना त्या कारणाने वादग्रस्त ठरणारे चांदवडचे उपजिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. प्रसूती साठी दाखल झालेल्या महिलेला वेळीच उपचार न दिल्याने नवजात बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

निर्मला सचिन पवार (वय 26) ह्या महिलेला प्रसूती वेदना होऊ लागल्याने महिलेस रुग्णवाहिकेने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. येथील कर्मचाऱ्यांनी लगेचच बाहेर गेलेल्या डॉक्टर अभिजित नाईक यांना महिला प्रसूती साठी दाखल झाली असल्याची माहिती दिली. मात्र, सदर डॉक्टर लगेचच रुग्णालयात हजर झाले नाहीत दुसरीकडे महिलेला तीव्र प्रसूती वेदना होत होत्या शेवटी दाखल केलेल्या बेडवरच महिला प्रसूत झाली. मरणयातना भोगल्यानंतर मुलगी जन्माला आली होती मात्र थोड्याच वेळात रुग्णालय प्रशासनाकडून तिला मृत घोषित करण्यात आले.

दरम्यानच्या काळात स्थानिक शिवसेनेचे चांदवड शहर प्रमुख संदीप उगले यांनी रुग्णालयात धाव घेतली होती. याच काळात डॉक्टर नाईक यांचे आगमन झाले मात्र ते नशेच्या अंमलात असल्याने शिवसैनिकांचा पारा चढला. यामुळे ज्या रुग्णालयातून “बेटी बचाव बेटी पढाव” चा नारा दिला जातो त्याच रुग्णालयात डॉक्टर वेळेत हजर न झाल्याने या निर्दोष नवजात बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, तालुका प्रमुख शांताराम ठाकरे, शहरप्रमुख संदीप उगले यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरत कडक कारवाईची मागणी केली आहे. डॉक्टर अभिजित नाईक यापूर्वी देखील वादग्रस्त ठरले असून त्यांच्या विरोधात चांदवड शहरात मोठा रोष निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

*