Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

महिनाभर कांदा भाव खाणार; उच्च प्रतीचा कांदा बारा हजार तर सरासरी दर क्विंटलला सात हजार

Share

नाशिक । प्रतिनिधी

उन्हाळ कांदा संपत आला असून लाल कांदाही पाहिजे तसा मार्केटमध्ये येत नाही. परिणामी मागणी आणि पुरवठा यांचा ताळमेळ बसत नसल्याने कांदा उच्चांकी दराने विकला जात आहे. परिणामी क्विंटलचा भाव 12 हजारांहून अधिक पोहोचला आहे. हा भाव उच्च प्रतीच्या मालाला मिळत असून क्विंटलला सरासरी उन्हाळ कांद्याला सात ते नऊ हजार रुपये तर लाल कांद्याला 5 हजार रुपये भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात 70 ते 80 रुपये किलो दराने कांदा विक्री होत आहे.

पावसामुळे प्रारंभी रोपे वाया गेली. परिणामी दोन-तीन टप्प्यात कांद्याचे बियाणे (उळे)टाकूनही ते पूर्णत: वाया गेले. पावसामुळे पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन झाले नाही. लिंबाच्या आकारा एवढेच कांदे उत्पादित झाले असून जे वाचले त्या कांदांचा आकार लहान आहे. उन्हाळ कांदाही बाजारात येणे जवळपास संपले आहे. अन्वर राजस्थान व दक्षिणेतून येणारा कांदाही संपला आहे. कारण या भागातही अतिवृष्टीमुळे कांदा वाया गेला आहे. सध्या लासलगाव, पिंपळगावसह इतर बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. अशी परिस्थिती अजूनही महिनाभर कायम राहणार असून 15 जानेवारी नंतरच आपल्याकडे बाजारात कांदा येईल, अशी स्थिती आहे.

जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र व देशभर मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा होत नसल्याने ईजिप्त व तुर्की होऊन कांद्याची आयात करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा कांदा डिसेंबरअखेर किंवा जानेवारीच्या पहिल्या सप्ताहात येईल. याच वेळी आपल्याकडे लाल कांदाही बाजारात येईल.त्यामुळे आयात केलेला व देशांतर्गत उत्पादित होणारा कांदा एकाच वेळी मार्केटमध्ये येणार असून बाजारभाव कोसळण्याची शक्यता आहे.

-नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!