Type to search

दिवाळी विशेष - रिपोर्ताज

Photo Gallery : नाशिकचा ऐतिहासिक वारसा

Share

पर्यटनाचे कौटुंबिक पॅकेज हे नाशिकच्या पर्यटनाचे अनोखे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. एखाद्या कुटुंबातील तीनही पिढ्यांच्या प्रतिनिधींनी स्वतंत्रपणे भेट द्यावी अशी अनेक ठिकाणे नाशिकमध्ये आहेत. ज्येष्ठांनी भेट द्यावी अशी धार्मिक स्थळे, मधल्या पिढीने धकाधकीच्या वेळापत्रकातून निवांतपणा अनुभवावा अशी ठिकाणे आणि तरुणाईच्या उत्साहाला आव्हान देणारे अनेक गडकिल्ले व धरणांच्या कुशीत फुललेले वॉटर स्पोर्टस्. कोणी आणि किती काय पहावे असा हा नाशिक जिल्हा. ओळख करुन घेऊया अशाच काही ठिकाणांची. जाणून घेऊ या त्यांची वैशिष्ट्ये

बोटॅनिकल गार्डन

टाटा कन्सल्टन्सीने आपल्या सीएसआर निधीतून नाशिक शहरामध्ये बोटॅनिकल गार्डन विकसित केले आहे. पूर्वी असलेल्या पंडित नेहरू वनोद्यानाचेच रूपांतर बोटॅनिकल गार्डनमध्ये करण्यात आले आहे. वृक्षसंवर्धनाचे, निसर्गाचे काय महत्त्व आहे हे पटवून देणारा ‘कथा अरण्याची’ हा लेझर शो सुरू केला होता. लेझर शो हे या गार्डनचे प्रमुख आकर्षण असल्याने सायंकाळी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

गायकवाडांचा वाडा, कौळाणे, मालेगाव

गावात एक नव्हे तर सात भले मोठे गायकवाडांचे वाडे आहेत. यातील दोन पूर्णपणे कोसळले आहेत. राममंदिर, महादेव मंदिर व हनुमान मंदिरासमोरील पटांगणातील आनंदरावांचा वाडा सयाजीरावांचा वाडा म्हणूनच ओळखला जातो. आनंदरावांचे वंशज सत्यजितराजे गायकवाड यांनी हा राजवाडा जपला आहे. सयाजीराजे 1881 मध्ये गादी सांभाळू लागल्यावर त्यांनी आपल्या भावंडांना व नातलगांना वाडे बांधून दिले. हे वाडे 1885 मध्ये बांधून झाले. याद्वारे नाशिकमधील वाडा संस्कृती अनुभवायला मिळते. वाड्याचे दरवाजाचे नक्षीकाम सज्जा अन् दुमली वाड्यातील दोन चौक, दगडी व लाकडी खांब, चौकांमधील तुळस, तळघर, वीस-पंचवीस खोल्या अन् आजूबाजूची नक्षी डोळ्यात भरते. पूर्वी या वाड्याच्या भिंती नैसर्गिक रंगांनी काढलेल्या चित्रांनी सजलेल्या होत्या.

तोफखाना केंद्र

देवळाली तोफखाना हे नाशिक शहरातील नाशिकरोड या ठिकाणी आहे. तसेच या ठिकाणी कॅन्टोन्मेंट बोर्डदेखील आहे. तसेच या ठिकाणी रणगाडे, तोफखाना संग्रहालय आहे. आशिया खंडातील हे सर्वात मोठे तोफखाना केंद्र आहे. सदरचे तोफखाना केंद्र 1947 मध्ये पाकिस्तानमधून नाशिक येथे स्थलांतरित झाले आहे. भारतीय सैन्य दलातील अधिकारी तसेच जवानांना या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते. तसेच बोफोर्स तोफांचेदेखील या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते.

सावरकर जन्मस्थान

क्रांतिकारकांचे शिरोमणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा भगूर येथे जन्म झालेला वाडा ऐतिहासिक वास्तू आहे. कंपाऊंड भिंतीच्या आतील वाडा बर्‍यापैकी मोठा आहे. आतमध्ये सावरकरांचा अर्धकृती पुतळा आहे. आतील खोल्यांमध्ये सावरकर कुटुंबियांचे आणि सावरकरांचे विविध प्रसंगी घेतलेल्या फोटोंना एन्लार्ज करून लावले आहे. 1995 च्या युती सरकारच्या काळात सरकारने तत्कालीन मालक-भाडेकरूंना नुकसान भरपाई देऊन हा वाडा पुरातत्त्व खात्याकडे दिला. यानंतर शक्य तितके मूळचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या ठिकाणी भेट दिल्यावर सावरकरांचे जीवनचरित्र डोळ्यासमोर उभे राहते.

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर एक विलक्षण असे संग्रहालय व एक संस्था आहे, हे मात्र बर्‍याच जणांना ‘ठावकी’ नसते! ते संग्रहालय व ती संस्था म्हणजे अंजनेरी येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन न्यूमिस्मॅटिक स्टडीज’ (म्हणजेच भारतीय नाणेशोध संस्थान). भारतातीलच नव्हे तर जगातील नाणेप्रेमींची पंढरी!

आपण आज जे चलन वापरतो त्याचा साक्षात ‘इतिहास’ या ठिकाणी जतन करून ठेवलेला आहे. अखंडित ऐतिहासिक परंपरा असणार्‍या आपल्या भारतीय इतिहासाचे एक वैशिष्ट्य म्हणजे नाण्यांची किमान अडीच हजार वर्षांची अखंडित परंपरा! भारतात, मौर्य कालखंडाच्याही पूर्वी इसपू. 500 पासून नाणी पाडली जात व ती आजही उपलब्ध आहेत. प्राचीन नाण्यांचा संग्रह, अभ्यास, संशोधन अगदी लिलाव करणारे थोडे लोक नाहीत! मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, सांगली यांसारख्या ठिकाणी अनेक संस्था-संघटना हे ‘वारसा जतनाचे’ काम करीत आहेत.

नाणक पितामह (कै.) डॉ. परमेश्वरीलाल गुप्त यांच्या मते, आहत (र्झीपलहारीज्ञशव) नाणी ही भगवान बुद्धांच्या म्हणजे इसपू. 600-700 इतकी जुनी आहेत. (परमेश्वरीलाल गुप्त यांनी यावर प्रबंध लिहिला आहे, विशेष म्हणजे हा प्रबंध प्रवासात हरवला असता त्यांनी तो पुन्हा लिहून पदवी मिळवली, ही तळटीप). अतिप्राचीन अशा या आहत नाण्यांवर कोणतीही लिपी वा मजकूर नसून फक्त सूर्य, चंद्र, झाड अशी चिन्हे आहेत! अंजनेरीच्या संग्रहालयात ही नाणी दिमाखात विराजमान आहेत. त्यांना पाहताना आपण सम्राट अशोकाच्या काळात कधी पोहोचलो हे आपणास समजत नाही. अर्थात, या संग्रहालयात प्रामुख्याने ताम्रमुद्रा जास्त ठेवल्या आहेत. सोने, चांदीची मौल्यवान नाणी संस्थेच्या तिजोरीत सुरक्षित आहेत. नाणे संग्रहालयात भारतातील नोटांचा व नाण्यांचा इतिहास व शोधांबद्दल या ठिकाणी चांगल्या प्रकारे माहिती उपलब्ध आहे. सदर नाणेसंग्रहालय हे सन 1980 मध्ये सुरू करण्यात आले आहे. अशा प्रकारचे आशिया खंडामधील ते एकमेव संग्रहालय आहे. सदर संग्रहलयाच्या आजूबाजूचा परिसर अतिशय प्रसन्न असून अंजनेरी टेकडीच्या बाजूला वसलेले आहे.

पांडवलेणी

नाशिकच्या प्राचीन पांडवलेणी प्रसिद्ध आहेत. सुमारे 2500 वर्षांपूर्वींची. येथे जो पाली भाषेतील शिलालेख आहे त्यावरून ही लेणी 2000 वर्षांपूर्वीचीच असल्याचे समजले जाते. या ठिकाणी एकूण 24 लेणी आहेत. काही लेण्या व त्यातील मूर्ती चांगल्या स्वरुपात तर काही खंडित स्वरुपात शिल्लक आहेत. बुद्धस्तुप, भिक्षूंची निवासस्थाने, बुद्धबोधिसविता, जैन तीर्थंकर ऋषभदेवजी, वीर मणिभद्रजी, माता अंबिकादेवी यांच्या मूर्ती, पाच पांडव मूर्ती, भीमाची गदा, कौरव मूर्ती, इंद्रसभा, देवादिकांच्या मूर्ती लेण्यात आहेत. मूर्तींची शिल्पकता वाखाणण्यासारखी आहे.

चामर लेणी

नाशिकच्या उत्तरेकडे साधारणत: 8 कि.मी. अंतरावर जैन लेणी आहेत. त्यास चामर लेणी म्हणतात. नाशिक-पेठ रस्त्यावर हा डोंगर आहे. नाशिक शहरातून चामर लेणी टेकडीचे सहज दर्शन होते. टेकडीच्या पायथ्यास म्हसरूळ गावी श्री पारसनाथ मंदिर 1942 साली बांधले आहे. या लेण्यांना तीर्थराज गजपंथ असेही संबोधले जाते. पायथ्यापाशीच क्षेमेंद्र कीर्ती यांची समाधीही आहे. ही लेणी साधारणत: 400 फूट उंचीवर आहेत व वरती जाण्यासाठी 435 पायर्‍या चढून जावे लागते. पायर्‍या चढून गेल्यावर इंद्र व अंबिका देवीच्या मूर्ती प्रथम दर्शनी पडतात. पुढे साडेतीन फूट उंचीची परसनाथांची मूर्ती आहे. ही लेणी अकराव्या शतकात बांधली असून जैनांच्या पवित्र तीर्थांपैकी एक आहेत. इथे अनेक जैन संतांचे श्वेत चरण पाहायला मिळतात. याच टेकडीवर चामर लेणी नावाच्या लेण्याही अस्तित्वात आहेत. मुख्य मंदिरात भगवान महावीरांची भव्य मूर्ती पाहावयास मिळते. या टेकडीवरून संपूर्ण नाशिकचे दर्शनही घेता येते.

सरकारवाडा (चोपडावाडा)

1818 मध्ये पेशवाई खालसा झाली आणि इंग्रजांनी भारतभर आपले साम्राज्य पसरले. या पेशवाईची एक खूण नाशिकमध्ये अजूनही उभी आहे. पेशवेकालीन सरकारवाडा पूर्णपणे ढासळला होता. मात्र पुरातत्त्व विभागाने तो पुन्हा उभारला. अतिशय जीर्ण अवस्थेत सरकारवाडा होता. अखेर कोट्यवधी रुपये खर्चून पुन्हा याचे जतन केले जातेय. लाकडी कोरीव कामाने दरबारी हॉलला नवा साज चढलाय. वाडा, त्यातला कारंजा, जुन्या काळातील कड्या, जिने बघणे केवळ अवर्णनीय आहे. या ठिकाणी प्राचीन मूर्ती, मराठा कालखंडातील चित्रकला तसेच आधुनिक मात्र दुर्मिळ चित्रकलेचा आविष्कार येथे पाहायला मिळतो. नाणी, शस्त्र, दस्तऐवज, पुरातत्त्वीय वस्तूंनी संग्रहालयाची शोभा वाढली आहे.

गारगोटी संग्रहालय

माळेगावच्या औद्योगिक वसाहतीत के. सी. पांडे यांनी दोन कोटी रुपये खर्च करून आशिया खंडातील पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे गारगोटी संग्रहालय उभारले. गारगोट्यांचा विविध आकारातील, रंगातील संग्रह थक्क करणारा आहे. सदरचे संग्रहालय हे सिन्नर येथील माळेगाव एमआयडीसी क्षेत्रामध्ये नाशिकपासून 28 कि.मी. अंतरावर आहे. या संग्रहालयाने वेगवेगळे पुरस्कार प्राप्त केले आहेत. हिरासदृश विविध खनिजांचे हे अत्युकृष्ट असे संग्रहालय आहे. या ठिकाणी अतिशय मौल्यवान असे विविध प्रकारचे खनिज पाहायला मिळतात.

या संग्रहालयास प्राईड ऑफ इंडिया, सरस्वती पुरस्कार, सिन्नर गौरव अशा प्रकारचे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विविध प्रकारचे रंगीबेरंगी खडक, स्फटिक, वेगवेगळ्या प्रकारामध्ये व आकारामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. आकर्षकपणे प्रदर्शित केलेले हे भारतातील एकमेव संग्रहालय आहे. या ठिकाणी दोन प्रकारची दालने असून पहिल्या मजल्यावर दख्खनचे पठार खनिजे तर तळमजल्यावर प्रतिष्ठा गॅलरी प्रदर्शित केलेली आहे. सदर ठिकाणी पर्यटकांना विविध खरेदीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!