कार्तिकीनिमित्त गोदाकाठी हरीहर भेट; भक्तिमय वातावरणात भाविक मंत्रमुग्ध

0
नाशिक । कार्तिकाचा पवित्र महिना, शेजारून वाहणारी संथ गोदामाई, रात्रीचे धीरगंभीर वातावरण आणि गोदाकाठी जमलेला शैव आणि वैष्णवांचा मेळा अशा भारावलेल्या वातावरणात हरिहराची भेट झाली आणि शिवात मिसळला हरी, गोदाकाठी अवतरली पंढरी अशी भाविकांची अवस्था झाली. कार्तिक शुद्ध चतुर्दशीच्या मुहूर्तावर मध्यरात्री झालेल्या या सोहळ्याचे भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले.

झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट, शेवंतीच्या वेण्या आणि गुलाबाचा दरवळणारा सुगर हरिहर भेट महोत्सवादरम्यान सुंदरनारायण मंदिरात भाविकांना अनुभवायला मिळाला. रविवार पेठेतील सुंदरनारायण मंदिरात हरिहर भेट महोत्सवानिमित्त फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यातच गुरुवारी झालेल्या हरिहर भेट सोहळ्याला भाविकांनी गर्दी केली होती.

कार्तिक शुक्ल दशमी ते प्रतिपदा या कालावधीत साजर्‍या होणार्‍या महोत्सवाची मंदिरात जय्यत तयारी करण्यात आली होती. मंदिराच्या गर्भगृहात मध्यभागी सूर्यनारायणाची (विष्णू) मूर्ती, विष्णूच्या उजव्या हाताला देवी लक्ष्मी आणि डाव्या बाजूला वृंदा (तुळस) आणि त्यांच्या पुढ्यात असणारे गरूड वाहन आकर्षक फुलांच्या सजावटीने भक्तांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी वृंदा देवीचे कंठी, चिंचपेटी, चंद्रहार या अलंकारातील रूप तर लक्ष्मीहार आणि कंठीहारातील नारायणाचे रूप अधिकच खुलून दिसत होते.

शनिवारी (दि. 12) वैकुंठ चतुर्दशीला गोरज मुहूर्तावर नारायणाचा वृंदा देवीसोबत पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळ्यानंतर गुरुवारी रात्री हरिहर भेटीचेदेखील आयोजन संस्थानतर्फे करण्यात आले होते.

गुरुवारी मध्यरात्री 12 वाजता श्री सुंदरनारायण मंदिर येथे श्री सुंदरनारायण आणि कपालेश्वर यांची भेट झाली. वर्षभर नारायणाला तुळस आणि महादेवाला बेल वाहण्यात येत असला तरी वैकुंठ चतुर्दशीच्या रात्री मात्र महादेवाला वाहिलेला बेल नारायणाला वाहण्यात आला तर नारायणाला वाहिलेली तुलशीपत्रे महादेवाला वाहण्यात आली. या तुळशीपत्रात नारायणाचा अंश आणि बेलपत्रात महादेवाचा अंश असल्याचा शास्त्रात उल्लेख असल्याने हरिहर भेटीत तुलसीपत्र आणि बेलपत्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

संपूर्ण भारत देशात हरिहर भेट फक्त नाशिकलाच होत असल्याने या महोत्सवासाठी देशभरातील विविध भागातून भाविक दर्शनासाठी आले होते. कार्तिक शुद्ध दशमीपासून सुरू झालेल्या हरिहर भेट महोत्सवाची कार्तिक शुद्ध प्रतिपदेला समाप्ती होणार आहे.

LEAVE A REPLY

*