विद्यार्थिनींसाठी दोन स्वतंत्र इमारती : पालकमंत्री गिरीश महाजन

0

पंचवटी : पंचवटीतील दिंडोरीरोडवरील मेरी वसाहतीत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असे वसतिगृह निर्माण करण्यात आले असून आज जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या वसतिगृहाची पाहणी केली. यावेळी महाजन यांनी महाराष्ट्रात कुठेही नसेल अश्या प्रकारची सुविधा याठिकाणी विद्यार्थ्यार्ंसाठी तयार करण्यात आले असल्याचे सांगितले.

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची मागणी अनेक दिवसांपासून होती. याबाबत गत तीन महिन्यांपूर्वी पूर्व विधानसभा मतदार संघाचे आ. बाळासाहेब सानप यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना लवकरात लवकर वसतिगृहाची मागणी पूर्ण केली जाईल, असे आश्वासित केले होते. तसेच याबाबत पालकमंत्री महाजन यांच्याकडे देखील पाठपुरावा केल्यानंतर मेरी वसाहतीमधील सद्यस्थितीत रिकाम्या असलेल्या दोन इमारतींमध्ये वसतिगृह तयार करण्याचा निर्णय झाला होता.

यानंतर मेरी वसाहतीतमधील दोन इमारतीत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आली असून यात प्रामुख्याने भोजनालय, प्रसाधनगृह, बैठक व्यवस्था, संगणक विभाग, व्यायामशाळा, प्रतीक्षालय, अभ्यासिका तसेच परिसर सुशोभित करण्यात आला आहे. महाजन म्हणाले, दोन्ही इमारतीत 120 विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. अशाच प्रकारे स्वतंत्र दोन इमारतीत 120 विद्यार्थिनींची सुविधा लवकरच करण्यात येणार आहे.

ही तात्पुरती व्यवस्था असून स्वतंत्र जागेवर वसतिगृहाची सहा मजली इमारत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया वर्षभरात पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यावेळी महाजन यांनी वसतिगृहाची पाहणी करून झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. इमारतीतील सुविधांबाबत त्यांनी अधिकार्‍यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रणजित हांडे, मेरीचे मुख्य अभियंता दिलीप जोशी, अधीक्षक अभियंता राजीव मुंदडा, अ. ल. पाठक आदी उपस्थित होते.

लवकरच प्रवेश प्रक्रिया
वसतिगृहासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रवेशासाठी समिती गठित करण्यात आली आहे. अर्जांची छाननी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्वरित वसतिगृह सुरू करण्यात येईल, असे महाजन यांनी सांगितले. तसेच गंगापूर नाका या मध्यवर्ती ठिकाणी 30 हजार स्वे. फूट जागा आरक्षित करण्यात आली आहे. तेथे तांत्रिक बाजू पूर्ण झाल्यावर वसतिगृहाच्या बांधकामाचा शुभारंभ केला जाईल. साधारण एक ते दीड वर्षात याठिकाणी हक्काचे वसतिगृह होईल, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

*