Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

ग्राउंड रिपोर्ट । त्र्यंबकेश्वर तालुका : ‘वर्षभर खायचे काय, जगायचे कसे?

Share

नाशिक : प्रतिनिधी | परतीच्या पावसाने जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात झोडपले असून पिके सडून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकर्‍यांचा टाहो सुरू आहे.

प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या आदिवासी भागात वर्षातून एकदाच भाताचे पीक काढले जाते. तेही पावसाने संपल्याने आता वर्षभर खायचे काय? जगायचे कसे? असा दिनवाणा प्रश्न आदिवासी शेतकरी उपस्थित करत आहेत. ‘देशदूत’च्या पथकाने त्र्यंबकेश्वर तसेच नाशिक तालुक्यातील पिंपळद (त्र्यं), विनायकनगर, गणेशगाव, ब्राह्मणवाडे, दिव्याचा पाडा, माळेगाव, धोंडेगाव, कश्यपी परिसर, रोहिले, गिरणारे या नुकसानग्रस्त आदिवासी भागात जाऊन शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी अस्मानी संकटामुळे हवालदिल झालेला शेतकरी या संकटाला तोंड देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

शासनाच्या मदतीची अपेक्षा तर आहेच परंतु केवळ दाखवण्यापुरती तुटपुंजी मदत नको तर जगण्याचे साधन मिळावे, अशी अपेक्षा हे शेतकरी व्यक्त करीत आहेत. पावसाच्या संकटाने हातातील पीक तर गेलेच परंतु ऊन पडताच आहे ते पदरात पाडून घेण्यासाठी जिद्दीने उभे राहून काढणी तसेच सोंगणी करतानाही दिसत आहेत.

जिल्ह्यात परतीच्या पावसाने लावलेली जोरदार हजेरी यामुळे आदिवासी भागातील प्रमुख पीक असलेल्या भात, वरई, नागली तसेच टोमॅटो, वटाणा, सोयाबीन, कापूस, मका या खरीप पिकांबरोबरच द्राक्ष, डाळिंब ही फळपिके, पालेभाज्या आणि फूलपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अडीच ते तीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा कृषी खात्याचा प्राथमिक अंदाज आहे. महसूल तसेच कृषी विभागाने या भागातील पिकांचे पंचनामे सुरू केले आहेत. मात्र त्यांच्याकडेही अपुरे मनुष्यबळ असल्याने सर्व ठिकाणी पोहोचणे अवघड ठरत आहे. पंचनामे होऊनही शासनाकडून किती मदत मिळेल व ती किती पुरेल याबाबत प्रत्येकाच्या मनात शंकाच आहे.

त्र्यंबकेश्वर तालुका अतिवृष्टीचा तालुका आहे. पावसाच्या जोरावर या भागात भात, नागली, वरई आदी पिके घेतली जातात. यातील शेतकर्‍यांना ऑक्टोबरमधील पाऊस धोकादायक ठरला. सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिके बाधित झाली आहेत. बहुतांश खाचरांमध्ये भात पीक काढणीला आले आहे, परंतु तयार झालेल्या भाताच्या पिकात पाणीच पाणी आहे. काही ठिकाणी काढणी करून पडलेला भात सडत आहे. अनेक ठिकाणी अतिपाण्याने दाणेच भरले नाहीत, तर बहुतांश भागात बुरशी लागून दाण्यांना काजळी चढली आहे.

या काजळीने शेतकर्‍यांची काळजी वाढवली आहे. चार-पाच दिवसांत पाऊस थांबला तर थोडेफार पीक हाती येणार आहे. त्यातही काजळीमुळे मिलवर तयार होणार्‍या तांदळात काळे दाणे आल्याने त्याची किंमत निम्म्याने कमी होणार आहे. मुळातच एकरी 18 ते 20 क्विंटल होणारा तांदूळ यंदा 5 ते 6 क्विंटलही होणार नसल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास काढून घेतल्यासारखी स्थिती झाली आहे.

भरपाई सरसकट द्यावी
रुजलेल्या भाताबरोबरच आडवा पडलेला तरंगता भात जो शेतकर्‍यांनी कापून नेला आहे आणि ओला भात सुकवून झोडणी होऊन पडलेला काळा तांदूळ या सगळ्या नुकसानीचे पंचनामे सरसकट होऊन नुकसान भरपाई देण्यात यावी. नुकसान भरपाई आणेवारी पद्धतीने न करता गुंठेवारी व एकरी मिळावी. कारण आदिवासी भागात हेक्टरी पद्धतीने शेती करत नाही. अनेक शेतमळे पडीक आहेत. त्यामुळे टक्केवारीत शेतीचे नुकसान कमी दिसणार आहे.
– नथू निवृत्ती उदार, शेतकरी, गणेशगाव

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!