Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

ग्राउंड रिपोर्ट । त्र्यंबकेश्वर तालुका : ‘काळे-गोरे’ पुढल्यावरीस.. आता ‘रोजंदारी’

Share

नाशिक । प्रतिनिधी
एकेकाळी शंभर पोते नागली पिकवली आता पाच पायली व्हतं नाय…, पावसामुळे शेतीची लय नासधूस झाली. त्यामुळ काळे-गोरे दाणे पुढल्या वर्षीच…., लोकप्रतिनिधी पोकळ आश्वासन देत आहेत, मात्र करत काहीच नाही. सरकारच्या भरवशावर शेतकरी बसलेले नाहीत, हक्काचे आहे तेच मागतोय, अशा शब्दात त्र्यंबक तालुक्यातील गणेशगाव (वाघेरा) येथील शेतकर्‍यांनी व्यथा मांडली.

त्र्यंबकपासून 20 किलोमीटरवर गणेशगाव वाघेरापैकी विनायकनगर हा छोटासा पाडा. साधारण 600 च्या आसपास लोकसंख्या. आज शेतीवर आलेल्या अवकळेमुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. हे पूर्णतः आदिवासी गाव असून प्रामुख्याने भात, नागली, वरईसह टोमॅटो आदी पिके येथे घेतली जातात. परंतु यावर्षी पावसाने घात केला अन् गर्भात आलेले पीक शेतकर्‍यापासून हिरावून घेतले. येथील नागरिक पुंजाजी खोटरे सांगतात, ऐन फुलोर्‍यात असताना भाताच्या पोटात पाणी शिरून वाढ खुंटली. परिणामी भाताला काजळी पडली.

त्यामुळे आता हे भात मिलमध्ये नेल्यास भाताची कणी होईल. परिणामी भाताला भावदेखील कमी मिळेल. नथू उदार सांगतात, आम्ही शेतकरी इतक्यात हतबल होणार नाही, परंतु शासनाने कृषी अधिकार्‍यांमार्फत प्रशिक्षण दिले पाहिजे, माती परीक्षण करणे आवश्यक आहे. दोन-तीन वर्षांपासून कर्जमाफीचा बाऊ केला पण कर्जमाफी काही झाली नाही. कर्जमाफीऐवजी दुसरे अनुदान देऊन आम्हाला उभे करावे. आमच्यापैकी अगदी पाच ते सहा लोकांनी पीकविमा काढला आहे.

काही लोकांनी फी अधिक असल्याने पीकविम्याचा फॉर्म भरला नाही. तुकाराम खोटरे सांगतात, दररोज पाऊस सुरू असल्याने कामकाज थांबले आहे. परिणामी गावातील लोक गिरणारे परिसरात रोजंदारीने कामाला जात आहेत. सुरगाणा, पेठ, कळवण, त्र्यंबक, इगतपुरी हा आदिवासी भाग असून याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष कमी असून आम्हा ज्येष्ठांकडे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाही. गावातील तरुण सध्या घरीच असल्याने ते रोजगार न मिळण्याची कारणेही सांगतात.

गावामध्ये रोजगाराची खूप वानवा आहे. रोजगार हमी योजना कुठे राबवण्यात येते हे आम्हाला माहीतसुद्धा होत नाही. ‘खरे म्हणजे शेती हे उपजीविकेचे साधन आहे. परंतु आम्ही रेशनच्या धान्यावर जगतोय’. पावसामुळे काळे-गोरे दाणे आता पुढल्या वरीसच. मोलमजुरीशिवाय आता पर्याय नाही, अशी भावना महाले यांनी व्यक्त केली.

एकूणच परिस्थिती पाहता या गावातील शेतीची नासधूस झाली असली तरी शेतकरी खचलेला नाही. पुन्हा एकदा जोमाने उभे राहत परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद त्यांना मिळत आहे. शेतकरी झगडतोय दोन वेळच्या भाकरीसाठी, फक्त शासनाने त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम करणे आवश्यक असल्याचे येथील परिस्थितीवरून दिसते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!