Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

गिरणारे बनले रोजगाराचे केंद्र; दररोज हजारोंचा जथ्था

Share

नाशिक | गोकुळ पवार :  नाशिक म्हटलं कि एमआयडीसी कामगारांचं गांव, बेरोजगारांचं शहरं अशी ओळख असलेल्या या शहरात अद्यापही रोजगाराची वाणवा आहे. परंतु शहरापासून १५ ते २० किमी अंतरावर असणाऱ्या गिरणारे परिसर रोजगाराचे केंद्र बनला आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून हजारो मजुरांना रोजगार मिळत असून यामुळे येथील उलाढाल वाढताना दिसत आहे.

गिरणारे हा परिसर समृद्ध शेतकऱ्यांनी बनलेला आहे. या शिवाराला द्राक्ष बागायती शेती लाभलेली आहे. यामुळे या भागात द्राक्ष उत्पादकांची संख्या अधिक असून टोमॅटो पीकही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे या भागात मजुरांची नेहमीच गरज भासत असते. शेती परिसर अधिक असल्याने अधिक मजूर कामासाठी लागत असतो. परिणामी परिसरातील मजूरवर्ग या ठिकाणी रोजगारासाठी येत असतो. तसेच मिनी सिटी म्हणून ओळख असलेली गिरणारेतून लोकांना रोजगार मिळणे महत्वाचे ठरते.

साधारण त्र्यंबकेश्वर तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्याची सीमा देवरगावपर्यंत तर इकडे गुजरात सीमेला लागून आहे. या परिसरात मुख्यत्वे भात शेती केली जाते. त्याचबरोबर नागली, टोमॅटो, भुईमूंग यासारख्या पिकांचे उत्पादन घेतले जाते. मात्र सध्या शेतीची कामे आटोक्यात येत असल्याने रोजगारासाठी गिरणारे गाठावे लागत आहे. यासाठी गिरणारेपासून तब्बल ६० किमीचे अंतरावर असलेले हरसूल, त्यानंतर वाघेरा, साप्ते, कोणे, हिरडी, रोहिले, माळेगाव, गणेशगाव आदी परिसरातून मजूर रोजगारासाठी गिरणारे येथे येत असतात. साधारण दररोज हजार -दोन हजार मजूर तीनशे ते चारशे रुपये मजुरीने या ठिकाणी येत असतो.

महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी येणारा मजूर सर्वच वयोगटातील असून यामध्ये आबालवृद्धांसह तरुणी, महिला तसेच युवकांचा समावेश दिसून येतो. या मजुरांना ने-आण करण्यासाठी खाजगी गाड्यांची चलती असून सकाळी मजुरांना घेऊन येणे तसेच सायकांळी घेऊन जाणे हा त्यांचा दिनक्रम आहे. मजुरीसाठी येणाऱ्यांमध्ये शाळकरी मुलांचाही समावेश आहे. त्यामुळे क्षमता नसतांनाही मुलांना मजुरी करावी लागते. ऐन दिवाळीच्या सुट्टीमध्ये ही मुले मजुरीसाठी गेल्याचे निदर्शनास आले होते. यामध्ये पालकांचे ही प्रोत्साहन या मुलांना असल्याची माहिती मिळाली आहे.

तसेच यंदा अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल होता. त्यामुळे काही दिवस मजुरांना माघारीही जाण्याची वेळ आली होती. परंतु आता टोमॅटो पिकांचे उत्पादन होत असल्याने या कामीदेखील रोजदारी मिळताना दिसत आहे. या ठिकाणी मजूर अधिक येत असल्याने ओझर, पिंपळगाव, निफाड येथील शेतकरी मजुरांना घेऊन जात असतात.

‘मनरेगा’बाबत उदासीनता
आदिवासी भागात रोजगारासाठी प्रचंड ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे येथे ग्रामपंचायतीमार्फत मनरेगा (राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) मार्फत कामे राबविली जात असली तरी तुटपुंजी मजुरी, वेळेवर न मिळणारे मानधन यामुळे आदिवासीं मजूर फारसे लक्ष देत नाही. परिणामी रोजंदारीसाठी शहराकडे पाऊले वळतात. यास सरकारी अनास्थाही जबाबदार असते.

सुशिक्षित बेरोजगार असून नोकरी नसल्याने मजुरीसाठी जावे लागते. गावापासून नाशिकला येणेजाणे परवडत नसल्याने येथे रोजगारासाठी येथे येत असतो. दरम्यान मजुरांची संख्या अधिक आल्याने स्वतंत्र मजूर नाका तयार करून देण्यात यावा.
-मनोहर खोटरे, मजूर

Tags:

1 Comment

  1. बळीराम जाधव November 22, 2019 7:39 pm

    गिरणारे येथे हजारो युवक हे युपी-बिहार येथून आलेली असून हे सर्व युवक गंगापूर डॅम बॅकवॉटर वर आंघोळीसाठीही जातात. तिथेच ते घाण करताना आढळून येतात.

Leave a Comment

error: Content is protected !!