Tuesday, April 23, 2024
Homeनाशिक कौतुकास्पद! आता मुलीही होणार सैन्यात अधिकारी; संरक्षण मंत्रालयाचा निर्णय

 कौतुकास्पद! आता मुलीही होणार सैन्यात अधिकारी; संरक्षण मंत्रालयाचा निर्णय

नाशिक । सैनिकी शाळांमध्ये आतापर्यंत फक्त मुलांनाच प्रवेश दिला जात होता. मात्र या शाळांमध्ये आता 2020-2021 या वर्षापासून मुलींनाही प्रवेश मिळणार आहे. संरक्षण मंत्रालयाने घेतलेल्या या क्रांतिकारी निर्णयासंबंधी ऑनलाईन नोंदणी व अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

विद्यार्थ्यांना शालेयदशेतच सैन्य शिस्तीचे धडे देत त्यांना राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए), नेव्हल अकादमी (एनए) अथवा आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (एएफएमसी) या अधिकारी तयार करणार्‍या अकादमींच्या प्रवेश परीक्षांसाठी तयार करण्याच्या उद्देशाने सन 1961 मध्ये या सैनिकी शाळा सुरू करण्यात आल्या. इयत्ता बारावीनंतर दिल्या जाणार्‍या एनडीए, एनए किंवा एएफएमसीसाठीच्या प्रवेश परीक्षा या देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असतात.

- Advertisement -

संरक्षण मंत्रालयाअंतर्गत यासाठी सैनिकी शाळा सोसायटीची स्थापना झाली. प्रत्येक राज्यात एक अशी शाळा सुरू करण्यात आली. त्यानुसार जून 1961 मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने सातार्‍यात ही शाळा सुरू झाली. काही राज्यांत अशा दोन शाळा आहेत. राज्यातील सातारा आणि चंद्रपूर येथे या शाळा आहेत. लष्कराच्या तिन्ही दलांमधील उच्चाधिकारी आणि अनेक प्रमुख हे सैनिकी शाळेचेच असल्याचे आजवर दिसून आले आहे. सैनिकी शाळेत दरवर्षी सहावी व नववीमध्ये प्रवेश घेता येतो. प्रवेश परीक्षा तसेच वैद्यकीय तपासणीद्वारे विद्यार्थ्यांची निवड होते. यामध्ये आता मुलींनाही प्रवेश दिला जाईल.

2020-2021 या शैक्षणिक वर्षापासून मुलींना सहाव्या वर्गात प्रवेश घेता येईल. यासाठी 6 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे. www.sainikschool.in या संकेतस्थळावर हा अर्ज करता येईल. परीक्षा 5 जानेवारी 2020 रोजी आहे. संरक्षण मंत्रालयाने सुरुवातीला पाच शाळांची निवड केली आहे. त्यामध्ये चंद्रपूरसह बिजापूर (कर्नाटक), कोडागू (कर्नाटक), कालिकिरी (आंध्र प्रदेश) व घोराखल (उत्तराखंड) यांचा समावेश आहे.

निकष :  वयाची अट : 1 एप्रिल 2008 ते 31 मार्च 2010 दरम्यान जन्म झालेल्या मुली, लेखी परीक्षा : पर्यायी प्रकारची परीक्षा. गणित (50 गुण), सामान्यज्ञान (25 गुण), भाषा (25 गुण) व बौद्धिक क्षमता (25 गुण), अर्जाची अखेरची तारीख : 6 डिसेंबर 2019.

- Advertisment -

ताज्या बातम्या